जिल्ह्यात पीकयुक्त शिवार करा

By admin | Published: May 2, 2017 01:08 AM2017-05-02T01:08:19+5:302017-05-02T01:08:19+5:30

जिल्ह्यातील १५२ गावे जलयुक्त करण्यात आली असून यापुढील काळात दोन हंगामी शेती शक्य व्हावी, ..

Shake the crop in the district | जिल्ह्यात पीकयुक्त शिवार करा

जिल्ह्यात पीकयुक्त शिवार करा

Next

पालकमंत्र्यांचे आवाहन : महाराष्ट्र दिनाचा मुख्य सोहळा उत्साहात
गडचिरोली : जिल्ह्यातील १५२ गावे जलयुक्त करण्यात आली असून यापुढील काळात दोन हंगामी शेती शक्य व्हावी, या दृष्टीकोणातून राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पीक युक्त शिवार कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास , वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरीत होऊन जनतेला केंद्रस्थानी ठेवत विद्यमान राज्य सरकार काम करीत आहे. नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकार काम करीत आहे. औद्योगिक विकासासोबत शाश्वत कृषी विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार काम करीत आहे.
गडचिरोली या वनव्याप्त जिल्ह्यात धानाची एक हंगामी शेती आहे. मात्र येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता प्राप्त व्हावी, यासाठी खास गडचिरोली जिल्ह्याकरिता कृषी समृध्दी अभियान हाती घेण्यात आले आहे. यात खरीप हंगामानंतर रबी हंगामात पिकांची पेरणी वाढावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १३ कोटी ५१ लाखांहून अधिक निधी प्राप्त झाला. सदर निधी ग्रामीण भागात रस्त्यांची जाळे विस्तारित करण्यासाठी खर्च झाला. चालू वर्षात हा निधी वाढवून २५ कोटी ८० लाखांहून जास्त करण्यात आला आहे. शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचण्यासोबत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊन त्यांचे जीवन सुकर होईल, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले. संचालन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर आभार निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

बीज भांडवल योजनेतून दोन वर्षात ७२ जणांना रोजगार
युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी शासन मदत करीत आहे. या वर्षात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३३ जणांना अनुदान देण्यात आले. यामुळे १८८ जणांना रोजगार मिळाला आहे. तसेच बीज भांडवल योजनेतून गेल्या दोन वर्षात ९२ जणांना रोजगार उपलब्ध झाला, अशी माहिती पालकमंत्री आत्राम यांनी दिली.

चालू वर्षात ९५ गावात वीज पोहोचणार
वीज पुरवठा नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये वीज पुरविण्याचे काम महसूल विभागाने आव्हान म्हणून स्वीकारले आहे. २१९ पैकी ३७ गावांचा वीज पुरवठा सुरळीत झाला. आता जिल्हा विकास मंडळाच्या माध्यमातून चालू वर्षात आणखी ९५ गावांमध्ये वीज पुरवठा होणार आहे. महसूल विभागाचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट १४२ टक्के पूर्ण करण्यात आले. याबद्दल जिल्हाधिकारी नायक व त्यांच्या सहकाऱ्यांचे पालकमंत्री आत्राम यांनी कौतुक केले.

बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मोटार सायकलद्वारे रूग्णालयापर्यंत रूग्णांना पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री आत्राम यांनी दिली. अशा प्रकारची बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा राहणार आहे, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.

पाच हजार विहिरींतून सिंचन व्यवस्था होणार
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मध्ये १५२ गावांची निवड करून या सर्व गावात जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. जलयुक्त शिवार अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षासाठी १६९ गावांची निवड करण्यात आली असून ही सर्व गावे जूनअखेर जलयुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे. या व्यतिरिक्त मागेल त्याला शेततळे या अंतर्गत १ हजार ५०० शेततळ्यांची निर्मिती होणार असून पाच हजार विहिरी खोदण्यात येणार आहे. या विहिरींच्या माध्यमातून संरक्षित सिंचन व्यवस्था जिल्ह्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन हंगामी शेतीकडे वळावे, असे आवाहन पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी केले.

Web Title: Shake the crop in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.