धर्मरावबाबांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गट ठोकणार शड्डू
By संजय तिपाले | Published: July 10, 2023 02:04 PM2023-07-10T14:04:33+5:302023-07-10T14:06:59+5:30
गडचिरोलीत बुधवारी बैठक : माजी मंत्री अनिल देशमुख साधणार समर्थकांशी संवाद
गडचिरोली : राज्यात घडलेल्या सत्तानाट्यात अजित पवार यांची साथ देणारे नेते शरद पवार गटाच्या टार्गेटवर आहेत. दोन दिवसांपूर्वी खुद्द शरद पवार यांनी नाशिकच्या येवला येथे मंत्री छगन भुजबळांच्या होमपिचमध्ये जाऊन जोरदार टोलेबाजी केली होती. आता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या बालेकिल्ल्यात माजी मंत्री अनिल देशमुख हे शड्डू ठोकणार आहेत. १२ जुलैला ते समर्थकांशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांसह अजित पवार यांनी भाजप व शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा दिला. याची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर प्रमुख आठ नेत्यांना मंत्रिपद मिळाले. अहेरी मतदारसंघातून विधानसभेत गेलेले जिल्ह्यातील मातब्बर नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या गटाने पुनर्बांधणीसाठी दौरे सुरु केले आहेत. याची सुरुवात नाशिकमधून करण्यात आली.आता धर्मरावबाबांच्या होमपिचवर माजी मंत्री अनिल देशमुख यांची तोफ धडाडणार आहे.
१२ जुलै रोजी ते शरद पवार यांना मानणाऱ्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. वर्धा येथील बैठक आटोपून ते दुपारी तीन वाजता गडचिरोलीत पोहोचतील. शहरातील एका मंगल कार्यालयात ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत ते समर्थकांना काय संदेश देतात व धर्मरावबाबा आत्राम यांच्या बंडावर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, शहराध्यक्ष व माजी न.प.सभापती विजय गोरडवार आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीची जय्यत तयारी सुरु केली असून शरद पवार यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात
धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकरांसह सर्व तालुकाप्रमुख तसेच रायुकॉ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर हे अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे शरद पवार गटासमोर संघटन बांधणीचे आव्हान आहे. गडचिरोली जिल्हा निरीक्षकपदी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केली. आता गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता आहे. तूर्त चामोर्शी बाजार समिती सभापती अतुल गण्यारपवार यांचे नाव यासाठी अग्रक्रमावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.