शार्पशुटरची पथके पुन्हा आरमोरीत येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2017 12:40 AM2017-06-04T00:40:12+5:302017-06-04T00:40:12+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या कुनघाडा रवी, अरसोडा, कासवी परिसरात नरभक्षक पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे.
आता तरी होणार काय तो नरभक्षक वाघ जेरबंद? : उपवनसंरक्षकांनी केली पथकाची मागणी
विलास चिलबुले । लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गेल्या दोन महिन्यांपासून वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या कुनघाडा रवी, अरसोडा, कासवी परिसरात नरभक्षक पट्टेदार वाघाची दहशत कायम आहे. सदर वाघाने दोन बळीही घेतले आहेत. शार्प शुटरचे दोन पथके ३० मे रोजी आरमोरी येथे दाखल झाली होती. दोन दिवस या पथकाने वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम राबविली मात्र वाघ हाती लागला नाही. त्यानंतर शार्प शुटरची पथके ताडोबाला परत गेली. आता पुन्हा वडसाचे उपवनसंरक्षक व्ही. व्ही. होशिंग यांनी शासनाकडे व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून शार्प शुटरची पथके पाठविण्याची मागणी केली आहे. लवकरच पुन्हा आरमोरीत शार्प शुटरची पथके ताडोबा येथून दाखल होणार आहे.
दहशत माजविणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने काही दिवसांपूर्वी कोंढाळा व रवी गावालगतच्या जंगल परिसरात पिंजरे लावले होते. मात्र पट्टेदार वाघ पिंजऱ्यात अडकला नाही. त्यामुळे सदर वाघाला गुंगीचे औषध देऊन शार्प शुटरच्या पथकामार्फत या वाघाला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या आदेशानुसार शार्प शुटरची दोन पथके ताडोबा येथून आरमोरीत दाखल झाले. शार्प शुटरच्या दोन्ही पथकाने वाघाची शोधमोहीम राबविली. मात्र आठवडा भराचा कालावधी उलटूनही या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात शार्प शुटरचे पथक व वन विभागाला यश आले नाही. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असल्याने मृग नक्षत्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असते. त्या नरभक्षक वाघाचा वावर असलेल्या जंगलालगत शेकडो एकर शेतजमीन आहे. या भागातील शेतकऱ्यांचे आता खरीप हंगामाकडे लक्ष लागले आहे. वाघाच्या दहशतीने या भागातील शेतकऱ्यांनी शेतीकडे जाणे केव्हाचेच बंद केले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात धान व इतर पिकांची लागवड शेतजमिनीत कशी करावी, या विवंचनेत अनेक शेतकरी सापडले आहेत.
लोकप्रतिनिधी कमालीचे उदासीन
आरमोरी हे राजकीय सत्ता केंद्र व घडामोडीचे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. या विधानसभा क्षेत्रात विविध पक्षांचे अनेक दिग्गज नेते आहेत. मात्र वाघाने बळी घेतलेल्या त्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याचे सौदार्य काही मोजके नेते सोडले तर इतरांनी दाखविले नाही. वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीला घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याचे दिसून येते. वन विभागासोबतच राजकीय पदाधिकारीही या मुद्यावर उदासीन दिसून येत आहेत.
नागरिकांना दररोज व्याघ्रदर्शन
वन विभागाने त्या नरभक्षक वाघाचे लोकेशन ट्रॅप करण्यासाठी कॅमेरे लावले. शिवाय पिंजऱ्याची व्यवस्था केली. त्यानंतर शार्प शुटर व वन विभागाच्या चमूही तैनात करण्यात आल्या. मात्र हे सारे करूनही वाघ जेरबंद झाला नाही. शार्प शुटरची टीम ताडोबाला परतल्यानंतर वडसा-आरमोरी मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच या भागातील शेतकऱ्यांना सातत्याने व्याघ्रदर्शन घडत आहे. परिणामी भीती कायम आहे.
खासगी वाहतूक बंदच
‘त्या’ नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे सकाळी व सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास वडसा-आरमोरी मार्गावरून आवागमन करण्यास वाहनधारक तयार नाहीत. केवळ दुपारच्या सुमारास काही मोजके वाहनधारक या मार्गाने प्रवास करतात. महामंडळाची बसफेरी वगळता खासगी वाहतूक पूर्णत: बंद आहे.
वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून शार्प शुटरचे पथक बोलाविण्यात आले होते. पथक दाखल झाले. मात्र विहित मुदतीत वाघ न मिळाल्यामुळे हे पथक ताडोबाला परत गेले. आपण शासन व वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र व्यवहार करून पुन्हा शार्प शुटरची पथके बोलाविली आहेत. पथके दाखल झाल्यानंतर लवकरच वाघ जेरबंद होईल.
-विवेक होशिंग,
उपवनसंरक्षक, वन विभाग वडसा