पोलिस होण्याचे भंगले स्वप्न, पाच जणांच्या हाती बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:03 AM2023-04-24T11:03:33+5:302023-04-24T11:04:37+5:30

बीड कनेक्शन उजेडात : खोट्या कागदपत्राआधारे मिळवले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

Shattered dream of becoming a policeman, shackles in the hands of five people | पोलिस होण्याचे भंगले स्वप्न, पाच जणांच्या हाती बेड्या

पोलिस होण्याचे भंगले स्वप्न, पाच जणांच्या हाती बेड्या

googlenewsNext

गडचिरोली : पोलिस अधीक्षकांना आलेल्या निनावी पत्राद्वारे खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचा भंडाफोड झाला आणि पोलिस बनू पाहणाऱ्या पाच जणांना बेड्या पडल्या. जिल्हा पाेलिस दलातील २०२१ च्या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली रुजू झालेले दोन पोलिस शिपाई आणि तात्पुरत्या यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेले तीन उमेदवार अशा पाच जणांना २२ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. दरम्यान, ही प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे उजेडात आल्याने पोलिसांनी बीड कनेक्शनच्या दिशेने तपास वळवला आहे.

राकेश देवकुमार वाढई (२९, रा. आलापल्ली, ता. अहेरी), वैभव दिलीप झाडे (२६, रा. नवेगाव, ता. मुडझा) या दोन पोलिस शिपायांसह तात्पुरत्या यादीतील आकाश रामभाऊ राऊत (२६), मंगेश सुखदेव लोणारकर (२६, दोघे रा. नवेगाव), मिन्नाथ पुरुषोत्तम थोरात (२९, रा. खरपुंडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन फरार आहेत.

जिल्हा पोलिस दलात चालक पोलिस व पोलिस शिपाई पदासाठी २०२१ मध्ये जाहिरात निघाली होती. नोव्हेंबर २०२२ पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यावर होती. अचानक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना एक निनावी पत्र प्राप्त झाले. त्यात भरती प्रक्रियेत तसेच मागील पोलिस भरतीत देखील काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली येथील एका व्यक्तीच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करून नोकरी मिळवल्याचा उल्लेख होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या पत्राआधारे चौकशीचे आदेश गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांना दिले.

एकाच मालमत्तेचे दोघांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे

पो.नि. भुसारी व उपनिरीक्षक दीपक कुंभारे यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या चार उमेदवारांचे प्रमाणपत्र हे बीड जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. तसेच मागील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड होऊन पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेल्या पाच उमेदवारांपैकी दोन उमेदवारांचे प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे आढळले.

सर्व प्रमाणपत्राची चौकशी पथकाने बारकाईने पाहणी केली तेव्हा असे निदर्शनास आले की, एकाच स्थावर मालमत्तेसंदर्भात दोन वेगवेगळ्या इसमांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यातील एक पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेला होता, तर त्यातील दुसऱ्याची सुरू असलेल्या पोलिस भरतीत तात्पुरत्या निवड केली होती.

रहिवासी गडचिरोलीचे अन् प्रमाणपत्र बीडचे

यावरून तपास यंत्रणेचा अधिकच संशय बळावल्याने त्यांनी बीड येथे जाऊन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रात दर्शविलेल्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात माहिती घेतली. तेव्हा मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली. त्यानंतर या उमेदवारांची कसून चौकशी केली असता पूर्वज बीडचे रहिवासी नव्हते, तसेच त्यांची तेथील कुठलीही स्थावर मालमत्ता शासनाने प्रकल्पाकरिता संपादित केली नसतानादेखील खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करण्यात आले असल्याची कबुली दिली. ..

खोट्या कागदपत्रांच्याआधारे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आल्याने गडचिरोली ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करून पाच जणांना अटक केली आहे. अन्य दोघे आरोपींच्या मागावर गुन्हे शाखेचे पथक आहे. तपास सुरू असून त्यानंतर सर्व बाबी उघडकीस येतील.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली

Web Title: Shattered dream of becoming a policeman, shackles in the hands of five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.