‘ती’ रुग्णवाहिका जुनीच
By admin | Published: June 21, 2017 01:43 AM2017-06-21T01:43:07+5:302017-06-21T01:43:07+5:30
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका देण्यात आली.
नागरिकांमध्ये नाराजी : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरमोरीत रुग्णवाहिका
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका देण्यात आली. मोठा गाजावाजा करून या रुग्णवाहिकेचे लोकार्पणही सोमवारी पार पडले. मात्र मिळालेली रुग्णवाहिका जुनी असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे.
आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात आरमोरी व जवळपासच्या ग्रामीण भागातील विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येतात. गंभीर स्थितीतील रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात येण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील रुग्णाला दवाखान्यात आणण्यासाठी एकच रुग्णवाहिका होती. सदर रुग्णवाहिका बाहेर गेली राहिल्यास व त्याचवेळी दुसरा गंभीर रुग्ण राहिल्यास त्या रुग्णाला पोहोचविण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला आणखी एक १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी होत होती.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. एक वर्षापूर्वीच १०८ ची रुग्णवाहिका आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला मंजूर झाली. परंतु सदर रुग्णवाहिका अहेरी व चामोर्शी येथे पळवून नेण्यात आली. त्यामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका मंजूर होऊनही प्रतीक्षा करावी लागली. तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध झाली. उशिरा का होईना रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मोठा गाजावाजा करून या रुग्णवाहिकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. मात्र हा आनंद फारकाळ टिकला नाही.
काही चिकित्सक नागरिकांनी रुग्णवाहिकेची पाहणी केली असता, रुग्णवाहिका जुनीच असल्याचे निदर्शनास आले. प्रतीक्षा करूनही मिळालेली रुग्णवाहिका जुनी असल्याचे दिसून आल्यानंतर नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी होत आहे.
श्रेय लाटण्यावरून वाद
रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. सदर रुग्णवाहिका मिळविण्यासाठी आपणच प्रयत्न केला होता, असा दावा आ. कृष्णा गजबे यांच्याकडून आजपर्यंत केला जात होता. मात्र रुग्णवाहिकेसाठी आपणही पाठपुरावा केला होता, असा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी मने यांनी केला आहे. रुग्णवाहिका व सोनोग्राफी मशिनसाठी डीपीसीमध्ये ठराव घेतला. आरोग्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्य संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठपुरावा केला. माझ्या बरोबरच ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या संचालिका शुभदा देशमुख यांनीही पाठपुरावा केला, असा दावा लक्ष्मी मने यांनी केला आहे.