‘ती’ झाडे ठरू शकतात अपघातास कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:11 AM2018-05-27T01:11:48+5:302018-05-27T01:11:48+5:30
धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-वणी-करंजी या ९३० क्रमांकाच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वैनगंगा नदीपासून गडचिरोलीपर्यंत महामार्गावर आणि लगत बनविण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांवर तब्बल ११७ झाडे वाहतुकीस अडथळा बनली आहेत.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-वणी-करंजी या ९३० क्रमांकाच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वैनगंगा नदीपासून गडचिरोलीपर्यंत महामार्गावर आणि लगत बनविण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांवर तब्बल ११७ झाडे वाहतुकीस अडथळा बनली आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी वन विभागाने दिली असून त्याची जबाबदारी महाराष्टÑ वन विकास महामंडळाकडे (एफडीसीएम) सोपविली आहे. मात्र एफडीसीएमकडून अद्याप एकही झाड तोडण्यात आलेले नाही. परिणामी वाहनधारकांना करावा लागणारा धोकादायक प्रवास मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे.
विद्यमान सरकारने कोट्यवधी रूपये किमतीच्या गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या कामास मंजुरी दिली आहे. यामध्ये ९३० क्रमांकाचा धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-करंजी, साकोली-आरमोरी-गडचिरोली-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या ३५३ सी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. सदर गडचिरोली-मूलपर्यंतच्या ४३ किमी अंतराच्या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गडचिरोली कार्यालयांतर्गत येते. सदर मार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. चंद्रपूरपासून मूलपर्यंतच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. व्याहाडपासून गडचिरोलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटकरणाचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. सदर काम टप्प्याटप्प्याने होत आहे. वैनगंगा नदी ते गडचिरोली शहरापर्यंतच्या मार्गावर तसेच लगतच्या कच्च्या रस्त्यावरील मिळून एकूण ११७ झाडे उभे आहेत. सदर झाडांची अद्यापही तोड करण्यात आली नाही. रस्त्यावर झाडे असल्याने वाहनधारकांना वाहन काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावर अपघात होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सर्व झाडांवर लाल पट्टी लावण्यात आली आहे. शिवाय वळणाच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याचे फलकही लावण्यात आले आहे. सदर मार्गाच्या जागेची मोजणी करण्यात आली असून या मार्गावरील ११७ झाडे तोडून देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षकांना देण्यात आले. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी सदर झाडे तोडण्याची परवानगी देऊन ही जबाबदारी वन विकास महामंडळाकडे सोपविली आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची देखरेख व प्रत्यक्ष तपासणीची जबाबदारी सरकारने आर. व्ही. कन्सटन्ट हैदराबाद यांच्याकडे सोपविली. सदर कंपनीचे प्रतिनिधी महामार्ग कामाचे पर्यवेक्षण करणार आहेत.
देखभालीचा कालावधी चार वर्षाचा
गडचिरोली-मूल व आरमोरी-गडचिरोली-आष्टी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित कंत्राटदाराला वर्क आॅर्डर दिल्यापासून दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर सदर मार्गाची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी चार वर्षापर्यंत संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे. दोन्ही राष्ट्रीय महामार्ग निर्मितीपासून चार वर्ष सुस्थितीत असणे बंधनकारक आहे. त्यापूर्वी सदर मार्गावर खड्डे निर्माण झाल्यास दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे.
नव्याने विद्युतीकरणासाठी पाच कोटी
गडचिरोली ते मूल या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदी ते गडचिरोली शहरापर्यंतच्या अंतरावर सदर मार्गावर अनेक वीज खांब व तारा आलेल्या आहेत. सदर वीज खांब काढून राष्ट्रीय महामार्गालगत नव्याने विद्युतीकरण करण्यात येणार आहे. महावितरणने याबाबतचा पाच कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय गडचिरोलीकडे सादर केला. सदर कार्यालयाने हा प्रस्ताव रस्ते व परिवहन महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबई यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मुंबईच्या कार्यालयाकडून या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे.
मुख्य अभियंत्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
राष्ट्रीय महामार्ग विभाग कोकण भवन मुंबई येथील मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यात दौरा केला. यावेळी त्यांनी मूल ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक बाबी त्यांनी यावेळी तपासल्या. सदर महामार्गाचे काम अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व कर्मचाºयांना त्यांनी दिल्या.
सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवर पूल बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा आढावा देशपांडे यांनी गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये घेतला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
साकोली-आष्टी-सिरोंचा मार्गाच्या कामाची निविदा उघडणार
शासनाच्या वतीने साकोली-आरमोरी-गडचिरोली-आष्टी- आलापल्ली-सिरोंचा या ३५३ सी क्रमांकाच्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर केले आहे. गडचिरोली कार्यालयाच्या हद्दित येणाऱ्या गडचिरोली इंदिरा गांधी चौक ते आष्टी इतक्या अंतराच्या मार्गाची संपूर्ण प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. सदर मार्गासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली येत असून टेंडर भरण्यात आले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर सदर मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.