‘ती’ चढली पॉवरग्रीडच्या टॉवरवर; गडचिरोलीत तीन तासांचे थरारनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:30 PM2019-06-05T13:30:34+5:302019-06-05T13:32:51+5:30
कोरचीपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगाव येथे बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास एक महिला पॉवरग्रीडच्या टॉवरवर चढल्याचे गावातील महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा सुरू केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरचीपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगाव येथे बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास एक महिला पॉवरग्रीडच्या टॉवरवर चढल्याचे गावातील महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आरडाओरडा सुरू केला. दरम्यान लोकमतचे प्रतिनिधी खासगी कामासाठी तेथे गेले असता त्यांनी ही गडबड ऐकली व प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिस व प्रशासनाशी संपर्क साधला.
या महिलेने खाली उतरावे म्हणून पोलिस अधिकारी, अन्य कर्मचारी वर्ग, तहसीलदार, राजस्व विभागाचे कर्मचारी आणि गावकरी शर्थीचे प्रयत्न करू लागले. मात्र ही महिला टॉवरच्या मध्यभागी पोहचली असल्याने तिला खाली उतरताही येत नव्हते. हे टॉवर उच्च विद्युत दाबाचे असल्याने तिच्या जीवाचे काही बरेवाईट होऊ नये यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. ती चुकून खाली पडली तर तिला इजा होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी एक मोठा पडदा हाती धरला होता. अखेर काही बहाद्दरांनी टॉवर चढून जाऊन तिला हळूहळू खाली उतरविले. या संपूर्ण घडामोडीला तब्बल तीन तास लागले. विदर्भातला उन्हाचा भर दुपारचा तडाखा सहन करत गावकरी तिच्या सुटकेसाठी तिष्ठत होते.
ही महिला २४ वर्षांची असून कोरची येथील असून तिचे नाव रामकली रुपेंद्र जमकातन असे आहे. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. काही दिवसांपासून ती वेडसर वागत असल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले.