शिफाने बँकेचीही केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:19 PM2019-05-25T23:19:38+5:302019-05-25T23:20:07+5:30
ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभारून कमी पैशात अधिक किमतीची वस्तू देण्याचे आमिष दाखवून शबाना उर्फ शिफा राज मोहम्मद चौधरी उर्फ शबाना मोहम्मद शेख या महिलेने देसाईगंजातील नागरिकांना पाच कोटी रुपयाने गंडविले. यापलिकडेही तिने येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून तीन लाख रुपयांचे मुद्रा लोन घेऊन पोबारा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभारून कमी पैशात अधिक किमतीची वस्तू देण्याचे आमिष दाखवून शबाना उर्फ शिफा राज मोहम्मद चौधरी उर्फ शबाना मोहम्मद शेख या महिलेने देसाईगंजातील नागरिकांना पाच कोटी रुपयाने गंडविले. यापलिकडेही तिने येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून तीन लाख रुपयांचे मुद्रा लोन घेऊन पोबारा केला. हा प्रकार उघडकीस आला असल्याने शिफाने व्यापारी, शिक्षक, धनाढ्य, बुध्दिजिवी नागरिकांना चांगलाच चुना लावला आहे.
शबाना उर्फ शिफा या महिलेने देसाईगंज शहरात आपला फसवणुकीचा गोरखधंदा चांगलाच व्यापक बनवला होता. देसाईगंज येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून १२ एप्रिल २०१६ रोजी तिने तीन लाख रुपयांचे मुद्रा लोन घेतले. या पैशातून तिने शिलाई मशीन व सायकली खरेदी केल्या. या वस्तूंची किंमत अनुक्रमे ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये होती. मात्र शिफाने लोकांना १ हजार रुपयात शिलाई मशीन व ५०० रुपयात सायकल विकणे सुरू केले. यामध्ये अनेकजण आमिषाला बळी पडले.
कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारच्या महागड्या वस्तू मिळत असल्याचे पाहून अनेक जण शिफाच्या या जाळ्यात अडकले. बऱ्याच जणांनी आपले सोनेचांदीचे दागिणे तारण ठेवून पैशाची व्यवस्था केली व ही रक्कम शिफाकडे गुंतविली. मुलांच्या शिक्षणाचे पैसेही अनेकांनी शिफाकडे गुंतविले.