लाखोंनी गंडविणाऱ्या शिफाला अखेर उत्तरप्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:21 AM2019-06-26T00:21:53+5:302019-06-26T00:23:10+5:30
कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंजवासीयांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा उर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना देसाईगंज पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बहेरमपूर जिल्ह्यातून अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंजवासीयांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा उर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना देसाईगंज पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बहेरमपूर जिल्ह्यातून अटक केली. त्यांना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत देसाईगंजमध्ये आणले जाणार आहे. शिफाच्या अटकेमुळे या प्रकरणात पडद्यामागची भूमिका निभावणारे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिफा हिने देसाईगंज शहरातील राजेंद्र वॉर्डात ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला होता. काही कालावधीनंतर शिवणक्लास व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्यानंतर एक हजार रुपयात सायकल, दोन हजार रुयात शिवणयंत्र, १० हजार रुपयात एक तोळे सोने, १५ हजार रुपयात घरकूल मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सुरूवातीच्या गुंतवणूकदारांना वस्तू देऊन त्यांचा विश्वासही संपादन केला. त्यानंतर अनेक नागरिक तिच्या भूलथापांना बळी पडू लागले. त्यानंतर मोठी योजना सुरू केली. त्यामध्ये २० हजार रुपयात दुचाकी, अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर, लक्झरी बसेस मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने मोठमोठ्या रकमा उकळल्या. मात्र त्यानंतर साहित्य देण्यास टाळटाळ होऊ लागली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देसाईगंज येथील बचत गटाच्या महिला, सोना-चांदीचे व्यापारी, सायकल विक्रेते, फर्निचर विक्रेत्यांनी शिफाच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच शिफाने पळ काढला. शिफा भाड्याने राहात असलेल्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले. या प्रकरणात एका मोठ्या व्यक्तीने पडद्यामागील भूमिका केल्याचे बोलले जाते. शिफाने जमविलेले पैसे त्या व्यक्तीकडेच दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच त्याचे नाव समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
असे घेतले ताब्यात
देसाईगंजचे पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे यांनी शिताफीने शिफा व तिच्या पतीचा शोध घेतला. ती उत्तरप्रदेशातल्या बहेरमपूर जिल्ह्यातील ताकियावा येथे पतीसह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर दि.१९ ला देसाईगंज ठाण्याचे उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांच्या नेतृत्वात चार जणांचे पथक तिकडे निघाले. फोटोच्या आधारे त्यांनी शिफा व तिच्या पतीला गाठले. दि.२३ च्या रात्री दोघांनाही ताब्यात घेतले. दि.२४ ला तेथील न्यायालयात हजर करून प्रवासी हस्तांतरण परवानगी घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपींना घेऊन ठाण्याचे पथक देसाईगंजकडे निघाले. मंगळवारी रात्री पोहोचल्यानंतर बुधवारी शिफा व तिच्या पतीला देसाईगंजच्या न्यायालयात हजर करून पीसीआर मागितला जाणार आहे.