‘ती’ चूक सुधारण्यासाठीच शिवसेना सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 05:00 AM2022-03-25T05:00:00+5:302022-03-25T05:00:45+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बरीच कामे सुरू झाली आहेत. आर.आर.पाटलांच्या कार्यकाळानंतर आता ना. शिंदे यांच्या काळात जिल्ह्याला मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा विषय निधीच्या उपलब्धतेनुसार पुढे येईलच, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजपसोबतच्या युतीला गृहीत धरून अनेक वर्षे आम्ही काही ठिकाणी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले नाही. त्यावर मर्यादा आल्या होत्या. पण ती चूक आता होणार नाही. चूक सुधारण्यासाठीच शिवसेनेने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत तीन दिवस जिल्ह्यात असलेले खा.शेवाळे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधून मुंबईकडे रवाना झाले.
या वेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेण्यासोबतच पक्षबांधणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेकडून सर्व जिल्ह्यांत शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या जिल्ह्यात कोरोनाकाळात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नाही. महिला पदाधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. कोणाला काही अधिकार नसल्यामुळे कार्यकर्ते आणि पक्ष संघटना यांच्यात थोडी दरी निर्माण झाली होती. ती कमी करण्यासाठीच पक्षसंघटनेवर आता भर दिला जाणार आहे. त्यासाठी लवकरच सर्व रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बरीच कामे सुरू झाली आहेत. आर.आर.पाटलांच्या कार्यकाळानंतर आता ना. शिंदे यांच्या काळात जिल्ह्याला मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजचा विषय निधीच्या उपलब्धतेनुसार पुढे येईलच, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे अनेक कामे अडली आहेत. त्यासोबतच वनांच्या या जिल्ह्यात वनविभागाच्याही काही अडचणी आहेत. त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. कोविडमुळे काही समस्या प्रलंबित आहेत.
वनविभागाचे तत्कालीन सचिव विकास खारगे यांच्यामार्फत त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, लवकरच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी माहिती शेवाळे यांनी यावेळी बाेलताना दिली.
भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये, मग आम्ही का राहू नये?
- गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रातही पक्षबांधणीकडे लक्ष दिले जाणार असल्याचे खा.शेवाळे म्हणाले. त्यावर ही आगामी निवडणुकीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असते. मग आम्ही आमची तयारी का करू नये? असा प्रतिसवाल त्यांनी केला.