कूरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेचा अध्यक्ष, तर भाजप बंडखोर उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 06:04 PM2022-02-14T18:04:37+5:302022-02-14T18:08:32+5:30
शिवसेना काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर, तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर नऊ विरुद्ध आठ मतांच्या फरकाने निवडून आल्या.
गडचिरोली : कूरखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनही बंडखोरीमुळे सत्ता गमाविण्याची नामुष्की भाजपवर आली. शिवसेना काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर, तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर नऊ विरुद्ध आठ मतांच्या फरकाने निवडून आल्या. भाजपला सत्ता स्थापनेला बंडखोरीचे ग्रहण हे ‘लाेकमत’चे भाकीत तंतोतंत खरे ठरले.
अध्यक्षपदाकरिता शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या वतीने अनिता बोरकर, तर भाजपच्या वतीने अल्का गिरडकर यांनी नामांकन दाखल केले. नऊ सदस्यसंख्येसह भाजपला स्पष्ट बहुमत हाेते. मात्र, अध्यक्षस्थानावरून पक्षातच एकमत नसल्याने कुरबुरी सुरू होत्या. नेमकी हीच परिस्थिती हेरत शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या पुढाऱ्यांनी भाजपच्या नाराज असलेल्या नगरसेविका जयश्री रासेकर यांच्याशी संधान साधले. याची भनकसुद्धा भाजप पुढाऱ्यांना रविवारी सायंकाळपर्यंत लागू दिली नाही.
साेमवारी सकाळी जयश्री रासेकर यांनी शिवसेना काँग्रेस आघाडीच्या सदस्यांसह सभागृहात प्रवेश केला. तेव्हाच परिस्थिती स्पष्ट झाली. बहुमतात असलेली भाजप अल्पमतात आले. शिवसेनेची अनिता बोरकर यांनी भाजपच्या अल्का गिरडकर यांचा व उपाध्यक्ष पदाकरिता आघाडीच्या वतीने दाखल बंडखोर भाजप नगरसेविका जयश्री रासेकर यांनी भाजप उमेदवार कलाम शेख (बबलू हुसैनी) यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी पराभव केला. निवडणूक निकालाची घोषणा होताच आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख किरण पांडव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हाणवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जीवन नाट, तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, शोएब मस्तान, आशाताई तुलावी, निरांजनी चंदेल, आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी काम पाहिले.
प्रवेश दारावर दोन्ही गटांत राडा
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता शिवसेना काँग्रेस आघाडीच्या सदस्यांसह भाजप बंडखोर सदस्या नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच भाजप व आघाडी या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली. एकमेकांच्या अंगावर धाऊन गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर व ठाणेदार अभय आष्टेकर यांच्या नेतृत्वात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणत शांतता प्रस्थापित केली.