वादग्रस्त पुस्तकावरील बंदीसाठी आलापल्लीत शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:30 PM2020-01-14T19:30:54+5:302020-01-14T19:31:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदणीय आहे.
गडचिरोली : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत करण्यात आली आहे. मोदी व शिवाजी यांची तुलना होऊच शकत नाही, त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी सोमवारी आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकात निदर्शने केली.
गडचिरोली जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार, उपजिल्हा प्रमुख रियाज शेख, अहेरी उपजिल्हा प्रमुख अरूण धुर्वे, तालुका प्रमुख अक्षय करपे, एटापल्ली शहर प्रमुख रवी मेश्राम, बिरजू गेडाम आदी उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदणीय आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. लेखक, प्रकाशक यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.