किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक, प्रतिमेला जोडे मारून नोंदवला निषेध
By गेापाल लाजुरकर | Published: July 20, 2023 03:13 PM2023-07-20T15:13:31+5:302023-07-20T15:18:51+5:30
आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट
गडचिरोली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी आक्रमक झाली असून पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकाराचा तीव्र निषेध केला. गडचिरोली येथे गुरुवारी शिवसेना महिला आघाडीतर्फे जिल्हा संघटिका छाया कुंभारे यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या प्रतीकात्मक फोटोला जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून आंदोलन करीत निषेध नोंदविला.
याप्रसंगी शाखा संघटिका ज्योत्स्ना राजूरकर, शीतल ठवरे, देवकी कंकडालवार, मंगला बिरणवार, शहर संघटिका स्मिता नैताम, तालुका समन्वयक गीता मेश्राम, महिला शाखाप्रमुख सीमा पाराशर, रोहिणी दीक्षित, रजनी वासलवार, स्वाती दासेवार, पौर्णिमा मडावी, स्मिता उके, छबू सावरबांदे आदी उपस्थित होते.