‘शिवाजी’चा प्रत्यय उराडे जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:13 AM2019-05-29T00:13:28+5:302019-05-29T00:18:13+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर झाला. त्यात गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर झाला. त्यात गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी अवघी ६८.८० टक्के आहे. गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रत्यय उराडे याने ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तर प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या प्रणय परतवार आणि पियुष म्हस्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले आहे.
केवळ पाच महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यात बारावीच्या निकालाची टक्केवारी ८५.५७ एवढी होती. २०१८ मध्ये हा निकाल जवळपास पाच टक्क्यांनी घटून ८०.९८ टक्क्यांवर आला. यावर्षी (२०१९) हा निकाल तब्बल १२ टक्क्यांनी घसरून ६८.८० टक्क्यांवर आला आहे.
यावर्षी जिल्हाभरातून एकूण १२ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात अवघे १०७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले आहेत. १२०७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ३२३ विद्यार्थी द्वितीय तर ११५८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचे ४ हजार ६८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३७२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ हजार ४१३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६६४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ३ हजार ५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ७ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ६९५ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार ६५४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४८२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत आहेत. वाणिज्य शाखेतील २५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ विद्यार्थी प्राविण्य श्रैणीत, ३५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १३७ द्वितीय तर २३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
प्रत्ययला व्हायचंय मेकॅनिकल इंजिनिअर
बारावीच्या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या गडचिरोलीच्या शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रत्यय जीवनलाल उराडे याला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे आहे, असे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले. प्रत्ययचे वडील जीवनलाल उराडे हे चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत हळदवाही येथील जि. प. शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आई वैैशाली उराडे या गृहिणी आहेत. प्रत्ययला एक मोठी बहिण असून तिने पुणे विद्यापीठातून एमएससीची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. बारावीत असताना दररोज ५ ते ६ तास व परीक्षा जवळ आल्यावर नियमित ७ ते ८ तास अभ्यास करीत होतो, असे प्रत्ययने सांगितले. खासगी शिकवणी सोबतच आपण सेल्फ स्टडीतून हे यश मिळविले, असे त्याने सांगितले.
प्रणय व पियुष सॉफ्टवेअर इंजिनियर होणार
जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या प्रणय परतवार (९१.८५ टक्के) याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचे आहे. शाळेत शिकविलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून दररोज ३ ते ४ तासाचा अभ्यास पुरेसा आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या काळात टेन्शन घेऊ नका, अन्यथा माहित असलेलेही उत्तर आठवत नाही, असा सल्ला त्याने दिला.
जिल्ह्यातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पियुष म्हस्के (९०.३१ टक्के) याने घरच्या विपरित परिस्थितीतून यश मिळविले. दररोज ४ तास अभ्यास नियमित अभ्यास केला. शाळेने खूप मदत आणि सहकार्य केल्याचे तो सांगतो. सायबर सिक्युरिटीसाठी काहीतरी करण्याची ईच्छा असून त्यासाठी इंजिनियर व्हायचे असल्याचे तो म्हणाला.