शिवाजीचा सौरभ तुरे जिल्ह्यात पहिला
By admin | Published: May 26, 2016 02:20 AM2016-05-26T02:20:32+5:302016-05-26T02:20:32+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल एटापल्ली तालुक्याचा ८९.७२ टक्के लागला आहे.
जिल्ह्याचा निकाल ८२.७१ टक्के : शिवकृपा महाविद्यालयाचा प्रतीक भुरसे जिल्ह्यात दुसरा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल एटापल्ली तालुक्याचा ८९.७२ टक्के लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आठ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा सौरभ अविनाश तुरे हा ९२.४६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. गडचिरोलीच्या शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा प्रतीक अनिल भुरसे हा ९१.०७ टक्के गुण घेऊन दुसरा तर गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची अश्विनी ऋषी कुळमेथे ही विद्यार्थिनी ८९ टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. जिल्ह्यात सरासरी निकालात मुलांच्या तुलनेत मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यातून १२ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५३ विद्यार्थी प्राविण्यासह तर २ हजार २२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. ७ हजार १८१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६४५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झालेत. १० हजार २०६ विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.७२ टक्के, कला शाखेचा निकाल ७६.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८८.३६ टक्के तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचा निकाल ७६.२३ टक्के लागला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पुनर्परीक्षार्थींचा जिल्ह्याचा निकाल २९.७२ टक्के
गडचिरोली जिल्ह्यातून ६१३ विद्यार्थ्यांनी १२ वीच्या पुनर्परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एक विद्यार्थी प्राविण्यासह, सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व १३७ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत. ६०९ पैकी केवळ १८१ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी २९.७२ टक्के आहे. पुनर्परीक्षार्थींच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल ५२.४८, कला शाखेचा निकाल २५.२२, वाणिज्य शाखेचा निकाल ३५.२९ व किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाचा निकाल १८.५२ टक्के लागला आहे.
जिल्ह्यात मुलांच्या निकालाची टक्केवारी ८१.१५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८४.३६ टक्के आहे.