शिवसैनिकांनी खासगी बस रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:50 PM2017-10-15T23:50:15+5:302017-10-15T23:50:25+5:30
छत्तीसगड राज्यातून रायपूर, राजनांदगाव वरून कोरची-कुरखेडा-देसाईगंज मार्गे चंद्रपूर, नागपूरकडे छत्तीसगड राज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीने खासगी प्रवाशी वाहतूक बस सुरू केल्याने कोरची, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : छत्तीसगड राज्यातून रायपूर, राजनांदगाव वरून कोरची-कुरखेडा-देसाईगंज मार्गे चंद्रपूर, नागपूरकडे छत्तीसगड राज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीने खासगी प्रवाशी वाहतूक बस सुरू केल्याने कोरची, कुरखेडा भागातील टॅक्सीचालक प्रवाशीविना बेरोजगार झाले होते. या बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी रविवारी कुरखेडा येथे बस रोको आंदोलन करून चार ते पाच खासगी प्रवासी बस छत्तीसगडकडे परत पाठविल्या.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख, काळीपिवळी टॅक्सी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी गुड्डू राठी, शब्बीर पठाण, नाशिर पठाण, निकेश कुळमेथे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
छत्तीसगड राज्यातील खासगी प्रवाशी बसेस गडचिरोली जिल्ह्यातून विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रवाशी घेऊन जात असल्याने येथील काळीपिवळी टॅक्सीचालकांना प्रवाशी मिळत नाही. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील टॅक्सी चालक-मालकांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे काळीपिवळी टॅक्सीधारकांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर समस्या निकाली काढण्यासाठी शिवसैनिकांनी रविवारी सकाळपासूनच कुरखेडा येथे खासगी प्रवाशी बस अडविणे सुरू केले. तेथील बसचालकाला समज देऊन चार ते पाच खासगी बसगाड्या छत्तीसगडकडे परत पाठविण्यात आल्या.