शिवशाही बसचा थाट तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:08 AM2018-04-25T00:08:00+5:302018-04-25T00:08:00+5:30

एसी व व्हॉल्वोची सुविधा उपलब्ध असल्याने शिवशाही बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून नफा प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र केवळ १३ दिवसात शिवशाही बसला सुमारे १ लाख १९ हजार ३९८ रूपयांचा तोटा झाला आहे.

Shivshahi bus failure | शिवशाही बसचा थाट तोट्यात

शिवशाही बसचा थाट तोट्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ दिवसांत सव्वा लाख रूपयांचा तोटा : उन्हाळा असतानाही अपेक्षेपेक्षा मिळताहेत कमी प्रवाशी

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसी व व्हॉल्वोची सुविधा उपलब्ध असल्याने शिवशाही बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून नफा प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र केवळ १३ दिवसात शिवशाही बसला सुमारे १ लाख १९ हजार ३९८ रूपयांचा तोटा झाला आहे.
बदलत्या काळानुसार प्रवाशी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस तसेच योजनांमध्ये अनेक बदल केले आहेत. राज्यातील काही प्रमुख मार्गांवर खासगी व्यावसायिक एसी व व्हॉल्वोची सुविधा असलेल्या बसेस चालवत आहेत. या बसेस नफ्यात आहेत. एसीची सुविधा असलेली बस एसटीच्या ताफ्यात आणल्यास प्रवाशांचा या बसला चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज लक्षात घेऊन राज्यभरात शिवशाही बसेस सुरू करण्यात आला. या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. गडचिरोली वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना शिवशाही बसेस उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यालाही शिवशाही बसेस देण्याची मागणी होत होती. ही मागणी एसटी महामंडळाने पूर्ण करीत गडचिरोली आगाराला दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिल्या.
१० एप्रिल रोजी लोकार्पण झाल्यानंतर त्याच दिवशी या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. १० एप्रिल ते २२ एप्रिल या १३ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ७६४ प्रवाशांची वाहतूक केली. यामध्ये ५ लाख ३७ हजार ७२२ रूपयांची उत्पन्न प्राप्त झाले. मात्र या बसेसवरील एकूण खर्च ६ लाख ५७ हजार १२० रूपये एवढा आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शिवशाही बसेसला १ लाख १९ हजार ३९८ रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. बसची एकूण प्रवाशी क्षमता ४५ एवढी आहे. किमान खर्च भरून निघण्यासाठी गडचिरोली ते नागपूरपर्यंत सरासरी ३३ प्रवाशी मिळणे आवश्यक आहे. मात्र सरासरी २९ प्रवाशी मिळत आहेत. त्यामुळे शिवशाही बसला तोटा सहन करावा लागत आहे. प्रवाशी वाढविण्याचे आव्हान आहे.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरही शिवशाही
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरही येत्या १५ दिवसात शिवशाही बसेस सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी गडचिरोली आगाराला दोन बसेस उपलब्ध होणार आहेत. चंद्रपूर आगारातील दोन बसेस सोडल्या जातील. प्रत्येकी एक तासाला चंद्रपूरसाठी शिवशाही बस सोडली जाणार आहे.
अहेरी-हैदराबाद मार्गावरच्या बसेस उपलब्ध झाल्या होत्या. मात्र त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड आढळल्याने सदर बसेस कंपनीकडे पाठविण्यात आल्या आहेत. या बसेस सुध्दा लवकरच उपलब्ध होणार आहे.

शिवशाही बसची तिकीट खासगी बसच्या तुलनेत थोडी अधिक असली तरी या बसमधील सुविधा लक्षात घेतल्या तर ही तिकीट जास्त वाटणार नाही. प्रवाशांना प्रवासाचा आनंद घेता येईल. खासगी बसच्या तुलनेत शिवशाहीच्या सिट अधिक आरामदायी आहेत. मागील १३ दिवसांत तोटा झाला असला तरी सुरूवातीच्या दिवशीपासून शिवशाहीचे उत्पन्न वाढत आहे. शिवशाहीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळून नफा प्राप्त होईल.
- निलेश बेलसरे, विभागीय वाहतूक अधिकारी, गडचिरोली

खासगी बसच्या तुलनेत तिकीट अधिक
शिवशाही बसेस गडचिरोली ते नागपूर या मार्गावर चालविल्या जात आहेत. याच मार्गावर एका खासगी व्यावसायिकाच्या एसी सुविधायुक्त बसेस धावत असून गडचिरोली-नागपूरची तिकीट २२० रूपये आहे. तर शिवशाहीची किंमत २७३ रूपये एवढी आहे. जवळपास ५३ रूपये तिकीट अधिक असल्याने काही प्रवाशी खासगी बसला पसंती दर्शवित असल्याचे दिसून येते. त्यामुळे तिकीटाच्या बाबतीत भविष्यातही शिवशाहीला खासगी बससोबत स्पर्धा करावी लागणार आहे. काही प्रवाशी केवळ कुतूहलापोटी शिवशाही बसमध्ये बसून प्रवास करीत आहेत. मात्र हा कुतूहल जास्त दिवस राहणार नाही. उन्हाळा असल्याने नागरिक एसी बसला पसंती दर्शवित आहेत. मात्र पावसाळा व हिवाळ्यात प्रवाशी मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशी टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शिवशाही बसला व एसटी कर्मचाऱ्यांना पेलावे लागणार आहे.

Web Title: Shivshahi bus failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.