नागपूर मार्गावर पुन्हा धावणार ‘शिवशाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली आगाराला मिळालेल्या दोन शिवशाही बसगाड्या महामंडळाने बंद केल्यानंतर नागपूरला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना एकही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली आगाराला मिळालेल्या दोन शिवशाही बसगाड्या महामंडळाने बंद केल्यानंतर नागपूरला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना एकही एसी बस नव्हती. मात्र आता पुन्हा गडचिरोली आगारासाठी दोन तर अहेरी आगारासाठी चार अशा एकूण सहा शिवशाही बसेस एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
एक वर्षापूर्वी गडचिरोली आगाराला दोन शिवशाही बसेस प्राप्त झाल्या होत्या. या बसेस गडचिरोली-नागपूर मार्गावर चालविल्या जात होत्या. मात्र दिवसेंदिवस तोटा वाढल्याने या बसेस परत करण्यात आल्या.
पुन्हा आठ दिवसांपूर्वी दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. वास्तविक यापूर्वीच्या बसेस खासगी कंपनीच्या होत्या. तर आता प्राप्त झालेल्या बसेस एसटी महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत.
अहेरी आगाराला चार बसेस मिळाल्या आहेत. त्यापैकी दोन बसेस अहेरी-अमरावती आणि उर्वरित दोन बसेस नागपूर व चंद्रपूरसाठी चालविल्या जाणार आहेत.
सीटर कम स्लीपर बसचा प्रस्ताव
अहेरी आगारातून तेलंगणा राज्यातील हैदराबादसाठी नियमित बसेस सोडल्या जातात. सदर प्रवास लांब असल्याने या मार्गावर सीटर कम स्लीपर बसेस चालविल्यास एसटी महामंडळाला चांगले प्रवाशी मिळू शकतात. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोलीचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांनी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये सिटर कम स्लीपर दोन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या बसेस उपलब्ध व्हाव्या, यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.