निकृष्ट पुलामुळे फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:18 PM2019-08-06T22:18:53+5:302019-08-06T22:19:30+5:30
तालुक्यातील कोटापल्ली-मोयाबिनपेठा मार्गावरील पुलाचे बांधकाम अलिकडेच काही दिवसापूर्वी करण्यात आले. मात्र या कामाचा दर्जा सुमार असल्याने आवागमनासाठी वाहनधारकांना अडचण येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील कोटापल्ली-मोयाबिनपेठा मार्गावरील पुलाचे बांधकाम अलिकडेच काही दिवसापूर्वी करण्यात आले. मात्र या कामाचा दर्जा सुमार असल्याने आवागमनासाठी वाहनधारकांना अडचण येत आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर कोटापल्ली परिसर असून हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. दुर्गम भागात पाहिजे, त्या प्रमाणात विकासकामे होत नाही आणि झाली तरी त्याचा दर्जा निकृष्ट राहतो. हा अनुभव अनेक लोकांना आला आहे.
कोटापल्ली-मोयाबिनपेठा हा रहदारीचा मार्ग असल्याने या मार्गावरून वाहनाची दिवसभर वर्दळ असते. मात्र सदर मार्गाची सुध्दा दैनावस्था झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहनधारक व नागरिकांना या मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र या बाबीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्त्याची पक्की दुरूस्ती केव्हा होणार, अशा प्रतिक्षेत नागरीक आहेत.