धक्कादायक! मासे पकडण्यासाठी चक्क नदीपात्रात विद्युत प्रवाह, व्हिडीओ व्हायरल
By संजय तिपाले | Published: November 22, 2023 05:02 PM2023-11-22T17:02:07+5:302023-11-22T17:05:04+5:30
कोंढाळा येथील घटना : अपघात झाल्यास जबाबदार कोण?
गडचिरोली : खरीप हंगाम संपल्यानंतर आता मासेमारीचा व्यवसाय जोमात सुरु झाला आहे. मात्र, मासे पकडण्यासाठी काही ठिकाणी जीवघेणे प्रयोग केले जात असल्याचे समोर आले आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळापासून तीन किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीपात्रात चक्क विद्युत प्रवाह सोडून मासे पकडले जात असल्याचा व्हिडीओ २२ नोव्हेंबरला समाजमाध्यमात व्हायरल झाला.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावालगत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याची सीमा आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वैनगंगा नदी वाहते. या नदीपात्रालगतच्या पिंपळगाव येथील घाटावर चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील काही लोक मासेमारीसाठी येतात. मात्र, मासे पकडण्यासाठी ते चक्क कृषीपंपांतून विद्युत जोडणी घेतात. तीनशे मीटरपर्यंत जोडणी घेतली जाते. काठीला वायर गुंडाळून जिवंत विद्युतप्रवाह नदीपात्रात सोडला जातो. या विद्युतप्रवाहामुळे मासे अलगद जाळ्यात अडकतात. मात्र, विद्युतप्रवाह असलेले वायर हाताळताना अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे मासे पकडण्यासाठी संपूर्ण नदीपात्रात विद्युत प्रवाह सोडल्याने इतरांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जलजीवही यामुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे मासेमारीसाठी विद्युत प्रवाहाचा जीवघेणा खेळ करणाऱ्यांना कोण अंकुश लावणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींतून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतील कृषीपंपांवरुन ही अनधिकृत जाेडणी घेतली जाते, त्यामुळे महावितरणचे स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करताना सीमेच्या अडचणी येतात, याचाच फायदा अशा प्रकारे मासेमारी करणारे लोक घेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
विद्युत प्रवाह सोडून मासेमारी करण्याचा प्रकार चुकीचा आहे. या जीवघेण्या प्रकाराबाबत मला माहिती नाही. मात्र, मी याबाबत खात्री करते. असे काही खरोखरच घडत असेल तर संबंधितांना रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- अपर्णा नितीन राऊत, सरपंच कोंढाळा