धक्कादायक! उपचाराअभावी डेंग्यूचे तीन बळी; आरोग्य विभाग गाफील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 02:01 PM2023-09-09T14:01:32+5:302023-09-09T14:10:39+5:30
तीन ग्रामपंचायतींमध्ये उद्रेक : टेकडा ताल्ला ग्रामस्थाच्या पत्राने खळबळ
सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आर्थिक परिस्थती बेताची असल्याने व वेळेत उपचार न मिळाल्याने तिघांचा बळी गेल्याचा खळबळजनक दावा टेकडा ताल्ला गावातील एका नागरिकाने केला आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. दरम्यान, तीन गावांत डेंग्यूचा उद्रेक होऊनही आरोग्य विभाग गाफील कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुर्गम सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद, माेकेला व नेमडा या तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीत डेंग्यूने डोके वर काढले आहे. तिघांना उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप टेकडा ताल्ला येथील सुधीर मुडूमडिगेला या नागरिकाने केला आहे. सुधीर यांनी ८ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र धाडले. त्यात डेंग्यूमुळे प्राण गमावलेल्या तीन व्यक्तींची नावे नमूद असून, बाधित ११३ रुग्णांच्या नावांचाही उल्लेख आहे.
या तीन गावांत डेंग्यूचे तब्बल तीनशे रुग्ण असून, घर तेथे रुग्ण अशी सध्या स्थिती आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण राबवून पाण्याचे नमुने तपासावेत, तसेच ग्रामपंचायतीने साचलेले डबके मोकळे करून पाणी वाहते करावे, स्वच्छता करावी आणि धूरफवारणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी सुधीर मुडूमडिगेला यांनी केली आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके व टेकडा ताल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वलके यां संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.
कोणी आलापल्लीला, कोणी तेलंगणाला!
दरम्यान, डेंग्यूची लक्षणे आढळलेल्यांपैकी काही रुग्ण सिरोंचातील ग्रामीण रुग्णालयात, काही आलापल्ली, काही अहेरीला, तर काहीजण तेलंगणातील मंचेरियल येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रवास खर्चासह इतर खर्चामुळे या रुग्णांवर आर्थिक ताण पडत आहे.
खासगी दवाखान्यांतही वाढली गर्दी
सध्या सिरोंचातील खासगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे. काही खासगी डॉक्टर तपासणी शुल्क व डेंग्यू चाचणीसाठी हजारो रुपये घेतात. एका रुग्णाला सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, त्यामुळे गरीब व मजूर वर्गाचे हाल होत आहेत.