दुकान गाळे व मोबाईल टॉवर सील
By Admin | Published: March 23, 2017 12:54 AM2017-03-23T00:54:43+5:302017-03-23T00:54:43+5:30
देसाईगंज नगर पालिका प्रशासनाने मालमत्ता व पाणी कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.
साडेपाच लाख रूपये जमा : कर वसुलीसाठी देसाईगंज पालिकेची धडक मोहीम
देसाईगंज : देसाईगंज नगर पालिका प्रशासनाने मालमत्ता व पाणी कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून बुधवारी थकबाकी असलेल्या करदात्यांचे नगर परिषद कॉम्प्लेक्समधील एक दुकान गाळे तसेच एक मोबाईल टॉवर सील केल्याची कारवाई करण्यात आली.
पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांच्या नेतृत्वात कर निरीक्षक एस. व्ही. नगराळे, बांधकाम अभियंता अनिल दाते, मुख्य लिपीक दा. रा. ढोंगे, लेखापाल भुर्रे, पाणी पुरवठा अभियंता विरेंद्र ढोके, नितीन गोरखेडे यांनी बुधवारी कर वसुलीची धडक मोहीम राबविली. सर्व वॉर्डात लाऊंडस्पिकरद्वारे जाहीर मुनादी देण्यात आली. तसेच पालिकेच्या नोटीस फलकावर थकबाकीदाराचे नाव प्रसिद्ध करण्यात आले. या धडक मोहिमेदरम्यान १ लाख ५० हजार रूपयांची मालमत्ता कर, ३ लाख ५० हजार रूपयांचे खोली भाडे, पाणीपट्टी करापोटी ६४ हजार ९३० असा एकूण ५ लाख ६४ हजार ९३० रूपये पालिका प्रशासनाने वसूल केले.
थकबाकीदारांनी मालमत्ता व पाणी कराचा वेळेच्या आत भरणा न केल्यास यापुढे जप्तीची कार्यवाही सुरूच राहणार, अशी माहिती मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांनी दिली आहे. ३१ मार्चपूर्वी १०० टक्के कर वसुली करण्यासाठी देसाईगंज नगर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. कर वसुली पथक वॉर्डावॉर्डात फिरत आहे. कर भरण्याचे आवाहनही केले जात आहे. (वार्ताहर)