चार दिवसात टप्प्याटप्प्याने उघडणार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:52+5:30

जिल्ह्यातील १४ हजारांवर मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील ६७१३ आणि इतर जिल्ह्यांमधून ७९९ मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. तेथील प्रशासनाकडून त्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे.

The shops will be opened in phases in four days | चार दिवसात टप्प्याटप्प्याने उघडणार दुकाने

चार दिवसात टप्प्याटप्प्याने उघडणार दुकाने

Next
ठळक मुद्देआढावा बैठक : सीमाभागात व रेल्वेने आलेल्यांसाठी मोफत बसेसची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे त्यांच्या गावात पोहोचवण्यासाठी जिल्हा सीमेपासून मोफत बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जाहीर केला. याशिवाय नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढील चार दिवसात टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यात येतील, मात्र नागरिकांनी आतापर्यंत केले तसे सहकार्य प्रशासनाला करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तिसरे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता व इतर महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
जिल्ह्यातील १४ हजारांवर मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील ६७१३ आणि इतर जिल्ह्यांमधून ७९९ मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. तेथील प्रशासनाकडून त्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे. यानंतर अनेक मजूर पायीच स्वगावी जाण्यासाठी निघत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांचे असे पायी जाणे त्यांच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या सर्व मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या बसेस त्यासाठी वापरल्या जाणार आहेत.
आंध्र प्रदेशमधून उद्या एक हजार मजुरांना घेऊन वडसा येथे रेल्वे येत आहे. त्यात ७ तालुक्यामधील विविध ठिकाणच्या मजुरांना मोफत बसद्वारे पोहोचवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रशासनाकडून त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.

अर्थव्यवस्थेची चाकं लवकरच फिरणार
प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या तसेच शारीरिक अंतर राखण्याचा अटीवर जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी तीन-चार दिवसात निर्णय घेत आहोत. गडचिरोली शहर तसेच तालुका मुख्यालयातील बाजारपेठांमधील दुकाने सुरू करण्याबाबत चार दिवसात निर्देश दिले जाणार आहे. अर्थव्यवस्थेची रूतलेली चाके लवकर फिरण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

तेंदुपत्ता संकलनाबाबतच्या अडचणी सोडवा
जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन सुरू होत आहे. मजुरांसह विविध कंत्राटदारांना यासाठी प्रवास व मजुरांची ने-आण करणे आवश्यक आहे. याबाबत काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याचा मुख्य आर्थिक स्रोत हा तेंदूपत्ता असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन सुव्यवस्थित होईल याकडे प्रशासनाने लक्ष घालावे, असे ते यावेळी म्हणाले.

प्रशासनाला सहकार्य करा
बाहेरून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करून लक्षणे असणाºयांना विलगीकरण कक्षात ठेवले जाईल, तर इतरांना घरीच विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यांच्यावर गावातील समित्यांचे लक्ष राहील. जनतेने प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळेच गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. पुढेही हा जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

Web Title: The shops will be opened in phases in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.