पीक विम्याला अल्प प्रतिसाद
By admin | Published: September 9, 2016 01:14 AM2016-09-09T01:14:10+5:302016-09-09T01:14:10+5:30
यावर्षीपासून पहिल्यांदाच केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेंतर्गत २३ हजार ७६८
पंतप्रधान कृषी पीक विमा योजना : कर्ज न घेतलेल्या केवळ ८१८ शेतकऱ्यांनी काढला विमा
गडचिरोली : यावर्षीपासून पहिल्यांदाच केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेंतर्गत २३ हजार ७६८ शेतकऱ्यांनी ३० हजार ८५१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. विम्याच्या प्रिमीअमचे २ कोटी ४१ लाख ५४ हजार रूपये शासनाकडे जमा केले आहेत. व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही कर्ज न घेणाऱ्या केवळ ८१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. उर्वरित शेतकरी कर्ज घेणारे असून त्यांना विमा काढणे सक्तीचे करण्यात आले होते.
शेतीचा संपूर्ण खेळ निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तर भरघोस उत्पादन होते. मात्र निसर्गाने साथ सोडली तर शेतीतून नफा तर सोडाच उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य होते. अशा परिस्थितीत संबंधित शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता अधिक राहते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये विद्यमान केंद्र शासनाने बदल केला असून या योजनेचे नाव सुध्दा बदलविले आहे. सदर योजना पंतप्रधान पीक विमा योजना म्हणून सुरू केली आहे.
खरीप हंगामाच्या सुरूवातीला पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली. योजनेची रूपरेषा शेतकऱ्यांना कळावी, यासाठी भाजपा कार्यकर्ते व प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र प्रत्यक्षात हे चित्र उलटे असल्याचे दिसून येत आहे.
सदर योजना कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सक्तीचे करण्यात आली होती. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचाच समावेश अधिक असल्याचे दिसून येते. एकूण २३ हजार ७६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यामध्ये २२ हजार ९५० शेतकरी हे कर्ज घेणारे आहेत. कर्ज घेणाऱ्यांना सदर योजना सक्तीची असल्याने या योजनेमध्ये त्यांना सहभाग घ्यावाच लागणार होता. कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी केवळ ८१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. याचा अर्थ शेतकरी स्वत:हून पीक विमा काढण्यासाठी गेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
यापूर्वीची योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची नव्हती. तरीही शेतकरी स्वत:हून पीक विमा काढत होते. यावर्षी मात्र स्वत:हून पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)