जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:38 AM2021-02-24T04:38:09+5:302021-02-24T04:38:09+5:30

ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावात अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत ...

Shortage of firewood in the district | जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा

जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा

googlenewsNext

ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावात अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पशुपालन योजनांची जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.

उपाहारगृहांमध्ये नियमांचे उल्लंघन

गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपहार गृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.

गांधी वॉर्डात फवारणीची मागणी

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वार्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत. यातील बहुतांश नाल्या उपसल्या जात नाही.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

कुरखेडा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासनाच्या योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.

रस्त्यावर कचरा; कारवाई करा

देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाही. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कठड्यांअभावी अपघाताची शक्यता

चामोर्शी : अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा

भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज

धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.

कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.

वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित

कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या

धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.

भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा

चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.

गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका

आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.

रस्त्यालगतची झाडे धाेकादायक

गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजुला झुडूप वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडूप तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अमिर्झा परिसरातील बऱ्याच मार्गावर रस्त्याच्या कडेला झाडेझुडूपे वाढली आहेत.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. यातून शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सुबाभूळच्या लाकडाला मागणी आहे.

Web Title: Shortage of firewood in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.