शॉर्टसर्किटने कारला आग
By admin | Published: April 22, 2017 01:26 AM2017-04-22T01:26:33+5:302017-04-22T01:26:33+5:30
चंद्रपूर येथून लग्न समारंभाकरिता सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला
संड्रा गावाजवळील घटना : लग्न समारंभासाठी आले होते युवक
अहेरी : चंद्रपूर येथून लग्न समारंभाकरिता सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील संड्रा गावाजवळ गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत वाहन जळून खाक झाले; मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चंद्रपूर येथून चार युवक रंगयापल्ली येथे लग्न समारंभाकरिता कारने आले होते. या युवकांनी दारूच्या शोधात आलापल्लीपासून २५ किमी अंतरावरील गुड्डीगुडम गाव गाठले. या ठिकाणी दारू मिळते काय? याबाबत नागरिकांकडून जाणून घेतले. त्यानंतर या युवकांनी इंदाराम, गेर्रा या गावात जाऊन दारू घेतली. बिअरच्या बॉटलही सोबत घेऊन ते रंगयापल्लीकडे निघाले. संड्रा गावापासून तीन किमी अंतरावर भर जंगलात कारने पेट घेतला. समयसुचकता दाखवित वाहन थांबवून युवकांनी कारमधून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याच युवकांनी संड्रा गावातनू पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अगदी पाच मिनिटातच आगीचे डोंब उसाळायला सुरूवात झाली. आग विझविण्याचा प्रयत्न करतानाच वाहनचालकाच्या हाताला जखम झाली आहे. कार जळाल्यानंतर चारही युवकांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)
यावर्षी कार जळाल्याची तिसरी घटना
कार जळाल्याची जिल्ह्यातील यावर्षीच्या उन्हाळ्यातील ही तिसरी घटना आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. लिलाधर कुंभारे यांची तर त्यानंतर जिल्हा परिषदेत मुलचेरा येथील नागरिकाची कार जळाली होती. त्यानंतर आता ही तिसरी कार जळाली आहे.