विद्यार्थ्यांना खेळाचा मार्ग दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:14 PM2017-12-23T22:14:28+5:302017-12-23T22:16:22+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत क्रीडा कलागुण आहेत. या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी नियमित अभ्यासाबरोबरच त्यांना खेळाचाही मार्ग दाखवावा. खेळासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत क्रीडा कलागुण आहेत. या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी नियमित अभ्यासाबरोबरच त्यांना खेळाचाही मार्ग दाखवावा. खेळासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गतच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय विभागीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपायुक्त सुरेंद्र सावरकर, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, भंडाराचे प्रकल्प अधिकारी पी.पृथ्वीराज, भामरागडचे प्रभारी प्रकल्प अधिकारी निरज मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, नागपूरचे सहायक आयुक्त (लेखा) विलीन खडसे, नागपूरचे सहायक आयुक्त दीपक हेडाऊ, नागपूरचे वरिष्ठ संशोधन सहायक मिलिंद नारंगे, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, नागपूरचे वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक विश्वास कातोरे उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी आपल्या मार्गदर्शनात खेळामध्ये जिंकावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे कधीकधी खेळादरम्यान वाद निर्माण होतात. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम समजून खिलाडूवृत्तीने शिस्तीत खेळ खेळावे, असे सांगितले.
प्रास्ताविक अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, संचालन ओमप्रकाश संग्रामे तर आभार प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेखा अधिकारी किशोर वाट, सहायक प्रकल्प अधिकारी ए.आर. शिवनकर, आर.के. लाडे, छाया घुटके, क्रीडा अधिकारी मदन टापरे, क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक सुधाकर गौरकर, अनिल सोमनकर, सुधीर शेंडे यांच्यासह विभागातील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
राज्यस्तरावर खेळणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना २५ गुण
यावेळी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले, शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली पारंपरिक संस्कृती जोपासावी. राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना २५ वाढीव गुण दिले जाणार आहेत. राज्यस्तरावर पदकप्राप्त केलेल्या खेळाडूंना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवले आहे. या निर्णयामुळे खेळाडूंना शासकीय नोकरी मिळण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन केले.
जनजागृतीपर देखावे ठरले आकर्षण
उद्घाटन समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. १९७२ मधील झोपडीत भरलेली आश्रमशाळा व २०१७ मध्ये असलेल्या आश्रमशाळांच्या भव्यदिव्य इमारती यांची तुलना करणारा देखावा विशेष आकर्षण ठरला. उद्घाटनप्रसंगी गडचिरोली प्रकल्पाच्या विद्यार्थिनींनी रेला नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
असामान्य बुध्दीमता असल्याचा नावलौकिक मिळविलेल्या गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील तुहीन मडावी या सहा वर्षाच्या बालकाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्याचे वडील तुलसीदार मडावी व आई तपशी मडावी उपस्थित होत्या. हे कभीडा संमेलन पुढील तीन दिवस चालणार आहे.