आष्टीत दुसऱ्या दिवशी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:17 AM2018-01-05T00:17:42+5:302018-01-05T00:17:52+5:30
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी उमटले. आष्टी येथे मात्र गुरूवारी सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये, पानठेले बंद करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी उमटले. आष्टी येथे मात्र गुरूवारी सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये, पानठेले बंद करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली.
आंबेडकरी अनुयायांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर घटनेचा निषेध नोंदवून निदर्शने केली. दरम्यान गावातून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी जि.प. सदस्य रूपाली पंदीलवार, उपसरपंच नंदा डोर्लीकर, मार्र्कंडा (कं.) च्या सरपंच अनिता अवसरमोल, संजय पंदीलवार, आनंद कांबळे, सत्यशील डोर्लीकर, अशोक खंडारे, धम्मा कांबळे, छोटू दुर्गे, रोहण रायपुरे, कालिदास डोर्लीकर, संजय मुरार व गावातील बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते.
गावात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आष्टी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सकाळपासूनच पोलीस मुख्य चौकासह अन्य ठिकाणी तैनात करण्यात आले. आंबेडकरी अनुयायांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, दुकाने, पानठेले बंद ठेवण्यात आली. दरम्यान गावातून काढण्यात आलेल्या रॅलीत बहुसंख्य बौद्ध समाजबांधव सहभागी झाले होते. विविध घोषणांच्या माध्यमातून भीमा-कोरेगावच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. या घटनेस कारणीभूत असणाºया लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.