दारू विक्रेत्यांवरील कारवाया थंडावल्या
By Admin | Published: September 10, 2016 01:13 AM2016-09-10T01:13:31+5:302016-09-10T01:13:31+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षकांच्या आवाहनानंतरही : विक्रेत्यांचे धंदे सुरूच
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. मात्र मागील सहा महिन्यांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात शहरी भागात पोलिसांची कारवाई पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक तालुका मुख्यालयात भ्रमणध्वनीवरूनही संपर्क केल्यावर सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याचे प्रकार सुरू झाले आहे. त्यामुळे महिलांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असून पोलीस यंत्रणा व उत्पादन शुल्क विभाग याबाबत काहीच करीत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूच्या व्यवसायात १० हजारावरील अधिक लोक सहभागी झाले आहेत. तरूण मुलापासून आबाल वृध्दांपर्यंत नागरिक अवैधरित्या दारू विक्री करीत आहे. परप्रांतातून दररोज मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होते. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दिमध्ये दारू विक्री होत आहे. नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध दारू विक्रेत्यांचे नावे कळवावे, यासाठी दोन अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली होती. मात्र त्यानंतरही अवैध दारू विक्री बंद झाली नाही. चामोर्शी येथून संपूर्ण जिल्ह्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा केला जातो. ज्या दारू विक्रेत्यांवर पाच पेक्षा अधिक गुन्हे दारूच्या संदर्भात आहे. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी महिला संघटनांनी केली होती. मात्र यावरही गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सवाच्या काळात कारवाई होईल, अशी आशा होती. परंतु अशी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दारू विक्रेते राजरोसपणे गावागावात दारूचा पुरवठा करीत आहे. उत्सवाचा काळ असून सुध्दा मुबलक प्रमाणात दारू जिल्ह्यात विकली जात आहे. उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली जिल्ह्यात कारवाया करीत नसल्याचे चित्र मागील दीड वर्षांपासून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)