भंगार बसेसचा प्रवाशांना फटका
By admin | Published: May 5, 2017 01:08 AM2017-05-05T01:08:35+5:302017-05-05T01:08:35+5:30
गडचिरोलीवरून ब्रह्मपुरीला जाणारी बस कुरूड गावाजवळ बंद पडली. परिणामी प्रवाशांना सायंकाळी
धक्का मारूनही बस सुरू होईना : कुरूड गावाजवळ बस पडली बंद; प्रवासी त्रस्त
देसाईगंज : गडचिरोलीवरून ब्रह्मपुरीला जाणारी बस कुरूड गावाजवळ बंद पडली. परिणामी प्रवाशांना सायंकाळी उशिरापर्यंत दुसऱ्या बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागले. भंगार बस उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ब्रह्मपुरी आगाराची एमएच ४० एन ८९५७ क्रमांकाची बस बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रवाशी घेऊन आरमोरीकडे मार्गस्थ झाली. दरम्यान बसमध्ये बिघाड निर्माण होऊन ही बस कुरूड गावाजवळ बंद पडली. प्रवाशांनी उतरून बसला धक्का मारला. मात्र बस सुरू झाली नाही. दुसरी बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चालक व वाहकाने दिले. मात्र दुसरी बस लवकर पोहोचली नाही. त्यामुळे प्रवाशांना रात्री उशीरापर्यंत ताटकळत बसावे लागले. आगारातून बस सोडताना ती व्यवस्थित आहे काय, याची शहानिशा करणे आवश्यक असतानाही आगारातील तांत्रिक कर्मचारी व चालक अनेकवेळा अशा प्रकारची शहानिशा करीत नाही. त्यामुळे मार्गात बस बंद पडल्याच्या घटना घडतात.