एसडीओ कार्यालयावर धडकला मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:24+5:30
देशभरात अतिप्रसंग, विनयभंग व बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडत असून आरोपींना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने राक्षसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपी राजेश कांबळे याचेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अतिजलद न्यायालयाची स्थापना करून सदर खटला ताबडतोब निकाली काढण्यात यावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर फाट्यानजीक ९ डिसेंबर रोजी सायंकाळला एका असाह्य परिचारिकेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटणेचे देसाईगंज तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले आहे. बुधवारी कोंढाळावासीयांसह परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. सदर घटनेची आरोपीला कठोर शिक्षा करून पीडित परिचारिकेस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांच्या नावे निवेदन पाठविण्यात आले. या मुकमोर्चात आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोती कुकरेजा, जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, कोंढाळाच्या सरपंच मंगला शेंडे, जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, पं.स.चे माजी उपसभापती नितीन राऊत, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुंभलवार, सुनील पारधी, कैलास राणे, पोलीस पाटील किरण कुंभलवार आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, शिवराजपूर फाट्यानजीकच्या घटनेत परिचारिकेवर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जीवे मारण्याचा आरोपीचा उद्देश होता, असे स्पष्ट होते. आरोपी राजेश कांबळे याने केलेले हे कृत्य घृणास्पद व निंदणीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे. देशभरात अतिप्रसंग, विनयभंग व बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडत असून आरोपींना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने राक्षसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपी राजेश कांबळे याचेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अतिजलद न्यायालयाची स्थापना करून सदर खटला ताबडतोब निकाली काढण्यात यावा. आरोपी राजेश कांबळेला कठोर शिक्षा देण्यात यावी. पीडित परिचारिकेला शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी. अतिप्रसंगी, विनयभंग व बलात्कारासारख्या घटना घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ओबीसी महासंघ, माळी समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.