दोन तिरडींवरून चौघांची अंत्ययात्रा, आमगावात फुटला अश्रूंचा बांध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:35 AM2023-04-26T10:35:02+5:302023-04-26T10:37:16+5:30

विजेचे बळी : ‘हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...’ भारत राजगडेंचे स्वर झाले मुके

singer bharat rajgade along with family killed in lightning strike, Funeral procession of four from two tirdis | दोन तिरडींवरून चौघांची अंत्ययात्रा, आमगावात फुटला अश्रूंचा बांध

दोन तिरडींवरून चौघांची अंत्ययात्रा, आमगावात फुटला अश्रूंचा बांध

googlenewsNext

पुरुषोत्तम भागडकर

देसाईगंज (जि. गडचिरोली) : कर्ता लेक, सून अन् दोन निरागस चिमुकल्या नातींचे मृतदेह पाहून ६५ वर्षांच्या आजीने एकच आक्रोश केला. दोन तिरड्यांवर चौघांची अंत्ययात्रा निघाली. हे चित्र काळीज हेलावणारे होते. शोकमग्न नातेवाईक, हुंदके अन् अश्रूंचा बांध फुटल्याने आमगाव बुट्टी गाव शोकसागरात बुडाले होते.

सासुरवाडीत नातेवाइकाचा लग्न समारंभ आटोपून दुचाकीवरून गावी परतताना नाट्यकलावंत व गायक भारत लक्ष्मण राजगडे (वय ३७) यांच्या कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. भारत लक्ष्मण राजगडे यांच्यासह पत्नी अंकिता (३०), तसेच देव्यांशी (५) व मनस्वी (३) या चिमुकल्यांचा कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे २४ एप्रिलला सायंकाळी वीज कोसळून मृत्यू झाला. मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाल्याने भारत राजगडे हे झाडाखाली थांबले अन् तेथेच या सर्व निष्पाप कुटुंबाला मृत्यूने गाठले.

भारत राजगडे यांनी भजनी मंडळ स्थापन करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत बक्षिसे पटकावली होती. नाटकांमध्ये गायनाचे कामही ते करत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भजने गाऊन त्यांनी देसाईगंज तालुक्यासह परिसरात नावलौकिक मिळविला होता. ‘आमुचा तू आमुचा तू सवंगडी... परी करीशी तू आपली खोडी... हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...’ अशा भजनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारत राजगडे यांचे स्वर मुके झाले. रसिकांना पोरके करून गेलेल्या भारत राजगडे यांच्या आठवणी जागवत त्यांनी गायलेल्या भजनांच्या चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

गावात चूल पेटली नाही

वीज कोसळल्याच्या घटनेने भारत राजगडे यांच्यासह पत्नी व दोन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले. घरात केवळ वयोवृद्ध पुष्पाबाई याच आहेत. या चौघांचा मृत्यू गावाला चटका लावून गेला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एकाही घरात चूल पेटली नाही. संपूर्ण गावकऱ्यांनी पुष्पाबाई राजगडे यांच्या घराजवळ गर्दी केली होती.

मृतदेह पाहून फोडला टाहो

४ रोजी सकाळी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८ वाजता चारही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी आमगाव बुट्टी येथे नेण्यात आले. घराजवळ रुग्णवाहिका पोहोचल्यावर मृतदेह पाहून भारत राजगडे यांच्या शोकमग्न आई पुष्पाबाई राजगडे यांनी टाहो फोडला. काही वेळ त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना नातेवाइकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत त्या स्तब्ध होत्या.

साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

भारत व अंकिता या दोघांचे पार्थिव वेगवेगळ्या तिरडीवर ठेवले होते. भारत यांच्यासह मोठी मुलगी देव्यांशी, तर आई अंकितासह धाकट्या मनस्वीचे पार्थिव ठेवले होते. अंत्यविधीला आमदार कृष्णा गजबे यांच्यासह हजारोंची गर्दी होती. काळीज हेलावणारे हे दृश्य होते. वैनगंगा नदीकाठी या चौघांचा एकाच ठिकाणी दफनविधी करण्यात आला.

Web Title: singer bharat rajgade along with family killed in lightning strike, Funeral procession of four from two tirdis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.