सिरोंचा-आलापल्ली-अहेरी मार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:52+5:30
अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिकांना काहीही मिळाले नाही. सध्याच्या आधुनिक युगात दळणवळण सेवेला अत्यंत महत्त्व आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा-आलापल्ली-अहेरी हा ११५ क्रमांकाचा राज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून त्यात पावसाचे पाणी साचले. परिणामी गर्भवती माता व विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना या मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिकांना काहीही मिळाले नाही. सध्याच्या आधुनिक युगात दळणवळण सेवेला अत्यंत महत्त्व आहे. गावा-गावाला व शहरा-शहराला जोडणारे रस्ते पक्के झाल्याशिवाय त्या भागातील विकास शक्य नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने आपापल्यास्तरावर पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत मुख्य रस्ते पक्क्या स्वरूपाचे बनविण्याचे काम गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात सुरू आहे. मात्र रस्ता विकासाचा अनुशेष अहेरी उपविभागात अजूनही कायम आहे.
सिरोंचा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. यापेक्षा मोठे रुग्णालय अहेरी येथे आहे. अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात सिरोंचाच्या रुग्णालयातून गंभीर रुग्ण रेफर केले जातात. यासाठी सिरोंचा, आलापल्ली, अहेरी या मार्गाने आवागमन करावे लागते. मात्र या रस्त्यावर दोन फूट खोल व दीड ते दोन फूट रूंद असे मोठे खड्डे असल्याने रुग्णवाहिकेला सुद्धा अहेरीला पोहोचण्यासाठी विलंब होतो. खड्ड्यांमधून धक्के खात अहेरीला जावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने ११५ क्रमांकाच्या सिरोंचा-आलापल्ली राज्य महामार्गाची पक्की दुरूस्ती केली नाही.
खड्डे बुजविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले
सिरोंचा-आलापल्ली या मार्गाची दुरवस्था झाली असून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सिरोंचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. द होप फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित तेपट्टीवार, समीर अरिगेला, रिजवान खान, अतुल सोनेकर, समीर, रिजवान यांनी रस्ता दुरूस्तीसाठी सहकार्य केले.