सिरोंचा बसस्थानकाचे काम थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:01:03+5:30
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरील पुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : शासनाच्या पाच कोटी रूपयांच्या निधीतून सिरोंचा येथे बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हे काम कोरोना लॉकडाऊनपर्यंत योग्यरित्या चालले. मात्र त्यानंतरचा निधी प्राप्त न झाल्याने हे काम संबंधित कंत्राटदाराने बंद पाडले आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून हे काम थंडबस्त्यात पडले असल्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. याच गतीने हे काम सुरू राहिल्यास ते नियोजित कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता नाही.
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरील पुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते. सिरोंचा येथे सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज बस स्थानक व्हावे, अशी मागणी येथील जनतेने अनेक वर्षांपासून केली होती.
सिरोंचा येथे हायटेक बस स्थानक व्हावे, यासाठी तत्कालीन राज्य शासनाकडे लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने सिरोंचा येथे सिरोंचा येथील बसस्थानकासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सिरोंचा शहर हे महत्त्वाचे शहर असून गडचिरोली जिल्हा होण्यापूर्वी या शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाला होता. सिरोंचा येथे सोमनूर संगम, कालेश्वर व इतर पर्यटनस्थळे असल्याने पर्यटकांची तालुक्यात वर्दळ असते. मात्र सिरोंचा येथे प्रशस्त बसस्थानक नसल्याने दूरवरून आलेल्या प्रवाशांची परवड होत असते. नव्या स्वरूपाच्या बसस्थानक इमारतीचे काम सुरू करण्यात आल्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. सिरोंचा भागातील वाहतूक सेवा बळकट होणार शिवाय प्रवाशांना सोयीसवलती मिळणार, अशी अपेक्षा होती, ही अपेक्षा आताही कायम आहे. मात्र आता निधी संपल्याच्या कारणावरून संबंधित कंत्राटदारांनी बसस्थानक इमारतीचे काम बंद केल्याने नागरिकांची सरकारप्रती नाराजी दिसून येत आहे. राज्य शासनाने सिरोंचा शहरातील बसस्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी मंजूर केलेला संपूर्ण निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
पहिल्या टप्प्यातील पावणे दोन कोटी खर्च
सिरोंचा येथील बसस्थानक इमारतीच्या कामासाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी प्रशासनाला पहिल्या टप्प्यात शासनाकडून जवळपास १ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या प्राप्त निधीतून कंत्राटदाराने बसस्थानक इमारतीचे काम केले. आता निधी संपल्याने कंत्राटदाराचे पुढील कामाचे देयक रखडले आहे. कोरोना लॉकडाऊनपासून हे काम बंद आहे. शासनाने सदर कामासाठीचा उर्वरित निधी लवकर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून हे काम मार्गी लागेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सिरोंचा बसस्थानकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.