सिरोंचा शहर समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:49+5:302016-01-02T08:34:49+5:30
तेलंगणा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या नगर पंचायती अंतर्गत दैनंदिन स्वच्छता व विकास कामांबाबत
नागभूषण चकिनारपू ल्ल सिरोंचा
तेलंगणा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या नगर पंचायती अंतर्गत दैनंदिन स्वच्छता व विकास कामांबाबत कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे सिरोंचा शहरात नाल्या तुडूंब भरल्या असून नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे. मोकाट जनावरे व डुकरांमुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. पथदिव्यांची समस्या ऐरणीवर आली आहे. एकूणच सिरोंचा शहराची बकाल अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे.
१७ सदस्यीय सिरोंचा नगर पालिकेमध्ये महिनाभरापूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विषय समित्यांचे सभापतींनी पदभार हाती घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने नायब तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्यांची मुख्याधिकारी म्हणून या नगर पंचायतीत नियुक्ती केली आहे. शासन, प्रशासन आरूढ झाल्यानंतर सिरोंचा शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र सिरोंचा शहराची बकाल अवस्था कायम असल्याने शहरातील नागरिकांचा पूरता भ्रमनिराश झाला आहे. तालुका मुख्यालयाच्या गावाचा विकास करण्यासाठी शासनाने सहा महिन्यांपूर्वी सिरोंचा शहराला नगर पंचायतीचा दर्जा दिला. मात्र विकास कागदावरच असल्याचे दिसून येते.
रस्त्यांची प्रचंड दुरवस्था
४शहरातील काही डांबरी रस्त्यावर रेती व माती साचली असल्याने डांबरीकरण लुप्त झाले आहे. रेती व मातीच्या धुळीमुळे रस्त्यालगतचे व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहे. परिणामी सर्दी, पडसे, खोकला व अस्थमासारखे आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. इंदिरा चौकापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंतचा डांबरीकरण रस्ता पूर्णत: मातीने झाकलेला आहे. त्यामुळे अनेक दुचाकी वाहनांना या ठिकाणी अपघात घडले. इंदिरा गांधी चौक ते प्राणहिता नदीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. एकूणच संपूर्ण शहरातील प्रवास धोक्याचा झाला आहे.
अनेक ठिकाणचे पथदिवे बंद
४संपूर्ण १७ ही प्रभागातील रस्त्यालगत पथदिवे लावणे नगर पंचायत प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. मात्र शहरातील पथदिवे बंद पडल्यानंतर पाच ते सहा महिने त्याची दुरूस्तीच केली जात नाही. सध्य:स्थितीत बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अंधारातूनच महिला भाविकांना मंदिराकडे ये-जा करावे लागत आहे. इतर मार्गावरीलही पथदिवे बंद आहेत. सातत्याने मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन पथदिवे सुरू करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे.
अपुऱ्या पाणीपुरवठ्याने महिलांची पायपीट
४सिरोंचा नगर पंचायतीच्या वतीने नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली असून योग्य नियोजन न झाल्याने शहरात पाण्याचे असमान पद्धतीने वाटप होत असल्याचे दिसून येत आहे. सखल भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळते. मात्र चढ भागातील नागरिकांना अनेकदा पाणीच मिळत नसल्याचे दिसून येते. लहानसहान तांत्रिक बिघाडामुळे येथील पाणीपुरवठा योजना तब्बल आठ-आठ दिवस बंद राहते. परिणामी नागरिकांचे प्रचंड हाल होतात. नव्या पदाधिकाऱ्यांना येथील पाण्याची समस्या कायम मार्गी लावण्यात अद्यापही यश आले नाही.
मोकाट जनावरे व डुकरांमुळे नागरिकांची दमछाक
४सिरोंचा शहरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांची संख्या भरमसाठ वाढली आहे. याशिवाय मोकाट कुत्रेही दिवसा व रात्री फिरत असल्याने नागरिक व शाळकरी मुले भयभित झाले आहेत. मोकाट जनावरांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक मोकाट जनावरे शहरातील मार्गामार्गावर फिरत असल्याने कोंडवाड्याचा उपयोगच होत नसल्याचे दिसून येते. कोंडवाड्याला झाडाझुडूपांनी वेढले असून बेवारस अवस्था प्राप्त झाली आहे. गुजरी बाजाराजवळ दररोज मोकाट जनावरांचा वावर असतो. सडक्या भाजीपाल्यावर मोकाट जनावरे ताव मारीत असून डुकरांच्या हैैदोसामुळे या परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे.
कचऱ्याचे ढीग कायमच
४१५-२० वर्षांपूर्वी स्वच्छ, सुंदर शहर अशी सिरोंचा शहराची ओळख होती. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. सिरोंचा नगर पंचायतीकडे ट्रॅक्टर, हातगाडी असूनही कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर लावली जात नाही. नगर पंचायतीचे सफाई कामगार जमा असलेल्या ठिकाणी आग लावून कचरा जाळून टाकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होत आहे. अनेक प्रकारचा ओला कचरा आगीत जळत नाही. त्याला दूर नेऊन फेकावे लागते. मात्र नगर पंचायत प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याच्या ढिगाची उचल करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही.