सिरोंचातील गुळाच्या दारूने घातली तेलंगणातील शौकिनांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 03:40 PM2022-01-21T15:40:11+5:302022-01-21T16:59:19+5:30
सिराेंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावात अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी नव्याने दारूची अवैध विक्री सुरू केली. या गावातून तालुक्यांतील काही गावांसह तेलंगणा राज्यातसुद्धा अवैध दारूचा पुरवठा केला जातो.
गडचिरोली : सिराेंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे राहत्या घरालगत गुळाचा सडवा टाकून दारू गाळली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीवरून सिराेंचा पाेलिसांनी धाड टाकून दोन घरांतून १ लाख ६७ हजार रुपये किमतीचा २४ ड्रम गुळाचा सडवा व साहित्य नष्ट केले.
सिरोंचा पोलीस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरीत्या गुरुवारी ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर सिरोंचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे याच भागातून तेलंगणा राज्यात दारूचा पुरवठा केला जाताे, अशी माहिती पाेलिसांना तपासात मिळाली.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या पोचमपल्ली गावात अवैध दारू विक्री बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी नव्याने दारूची अवैध विक्री सुरू केली. या गावातून तालुक्यांतील काही गावांसह तेलंगणा राज्यात सुद्धा अवैध दारूचा पुरवठा केला जातो. गावात दारू गाळण्यासाठी घर परिसरात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळताच सिरोंचा पोलीस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरीत्या दोन घरी धाड टाकली. दरम्यान, एका घरी २१ ड्रम व दुसऱ्या घरी ३ ड्रम, असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा २४ ड्रम गुळाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले.
संपूर्ण मुद्देमाल जागेवरच नष्ट करून दोघांवर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राजू चव्हाण व पोलीस पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते.