सिरोंचाचे बाल विकास प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:39 AM2018-09-29T00:39:50+5:302018-09-29T00:40:15+5:30
तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पोषण आहार पुरविण्यासोबतच त्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी केंद्रांवर आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या वतीने गर्भवती माता व मुला, मुलींना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पोषण आहार पुरविण्यासोबतच त्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी केंद्रांवर आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या वतीने गर्भवती माता व मुला, मुलींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र सिरोंचा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने या कार्यालयाचा कारभार सध्या वाºयावर असल्याचे दिसून येते.
अहेरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही.के.गडदे यांच्याकडे प्रकल्प अधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र ते अहेरी येथून ये-जा करीत असल्याने पूर्णवेळ देऊ शकत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत या कार्यालयाचा कारभार उषा भांडेकर नावाच्या पर्यवेक्षिका सांभाळतात. येथे विस्तार अधिकारी व परिचाराचेही पद रिक्त आहे. याशिवाय या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत मदतनीसांचे सहा पदे रिक्त आहेत. या कार्यालयात नियमित व स्थायी प्रकल्प अधिकारी नसल्याने तालुक्यातील अंगणवाडी केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी केली जाते. अंगणवाडी केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा प्रकल्प कार्यालयामार्फत घेतला जातो. मात्र सिरोंचाच्या कार्यालयात नियमित व स्थायी अधिकारी नसल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमधील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शिवाय अंगणवाडी सेविका व मदतनीसांची अनेक पदे रिक्त आहेत. शासनाकडे सातत्याने मागणी करूनही प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारीसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाल विकास योजनेचा बट्ट्याबोळ होत आहे.
प्रकल्प कार्यालय इमारतीची दुरवस्था
सिरोंचा येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयाला अद्यापही स्वतंत्र व पक्की इमारत नाही. जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या पडक्या इमारतीत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध नाही. तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या सेविकांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रशस्त हॉलही नाही. त्यामुळे या पडक्या इमारतीतच बैठका घेतल्या जातात. सदर कार्यालयाची इमारत कौलारू असून कवेलू फुटलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या कार्यालयात पाणी गळती लागले. कार्यालयाच्या सभोवताल गवत उगवले आहे. एकूणच प्रकल्प कार्यालय इमारत व परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहे.