रामगडातील सीताफळ व जांभूळ प्रक्रिया प्रकल्प जळून खाक; ३० लाख रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:47 PM2023-01-24T17:47:44+5:302023-01-24T17:47:57+5:30
यंत्रसामग्री, साहित्य, फर्निचर झाले नष्ट
कूरखेडा (गडचिरोली) : तालुक्यातील रामगड येथे महिला ग्राम संघाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सीताफळ व जांभूळ प्रक्रिया प्रकल्प इमारतीला साेमवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत प्रकल्पाची यंत्रसामग्री, साहित्य फर्निचर असा एकूण ३० लक्ष रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत महिला ग्रामसंघ रामगड व शक्ती महिला प्रभाग संघ पुराडा यांच्या संयुक्त विद्यमाने रामगड येथे सीताफळ व जांभूळ फळ प्रक्रिया युनिट ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. डिसेंबर महिन्यात मानव विकास मिशन योजनेतून सोलर सिस्टम बसविण्यात आले होते. या प्रकल्पातून साेमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास धूर निघत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आले. त्यांनी तिकडे धाव आग विझविण्याचा प्रयत्न केला. नगरपंचायत कूरखेडा येथील अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. अग्निशमन यंत्रणा वेळेत पाेहाेचली. मात्र, ताेपर्यंत प्रकल्पातील यंत्रसामुग्री साहित्य व फर्निचर जळून खाक झाले होते. या आगीत यंत्रसामग्री, साहित्य, सीताफळ, जांभूळ बिया व अर्काचा साठा, ग्रामसंघ कार्यालयाचे फर्निचर व रेकार्ड असे एकूण अंदाजे ३० लक्ष रुपयांचे नुकसान झाले. याबाबत पुराडा पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिर्के, संवर्ग विकास अधिकारी धीरज पाटील, पुराडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांनी घटनास्थळाला भेट देत नुकसानीची पाहणी केली.
५० महिलांचा राेजगार हिरावला
मागील दोन वर्षांपासून रामगड ग्रामपंचायतीच्या इमारतीत सुरू असलेल्या या प्रकल्पात परिसरातील जवळपास ५० महिलांना रोजगार उपलब्ध झालेला होता. मात्र, आगीत हा प्रकल्प जळून खाक झाल्याने महिलांच्या रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे.
चार लाखांची पॅकिंग मशीन बचावली
मानव विकास मिशनच्या निधीतून चार लाख रुपये किमतीची पॅकिंग मशीन खरेदी करण्यात आली हाेती. सदर मशीन दुसऱ्या राज्यातून बाेलाविण्यात आली आहे. ही मशीन दाेन ते तीन दिवसांत प्रकल्पात पाेहाेचणार हाेती. मात्र, साेमवारी प्रकल्पाला आग लागली. ही मशीन प्रकल्पात पाेहाेचली असती तर सदर मशीनही जळून खाक झाली असती.