सीताटोला गावाला मिळणार महसुली गावाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:18+5:302021-09-22T04:40:18+5:30
सिताटोला हे गाव धानोरा तालुक्यातील मोहली ते जपतलाई या मार्गावर भागात वसलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुमारे १२ पिढ्यांपासून या ...
सिताटोला हे गाव धानोरा तालुक्यातील मोहली ते जपतलाई या मार्गावर भागात वसलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुमारे १२ पिढ्यांपासून या ठिकाणी शेती करण्यासाठी आलेले नागरिक वस्ती करून राहू लागलेत. त्यानंतर ते त्याच ठिकाणी स्थायिक झालेत. परंतु सिताटोला हे गाव मोडेभट्टी या गावाचा टोला म्हणून आजपर्यंत ओळखले जात आहे. सिताटोला येथे सन १९६३ पासून जि. प. प्राथ. शाळा आहे. तसेच सदर गावात एकूण ४२ कुटुंबे राहत असून, या गावाची एकूण लोकसंख्या २४३ आहे. या गावात एकूण मतदार १३२ आहेत.
या गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन ग्रामसभा आयोजित केली. ग्रामसभेत ठराव घेऊन जिल्हाधिकारी यांना सादर केला. सदर ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांनी गाव घोषित सभा घेतली. या वेळी त्यांनी गावातील प्रौढ मतदारांचे मतदान घेतले. या वेळी एकूण मतदारांपैकी सुमारे ९० टक्के मतदारांनी सिताटोला गावाच्या नावास संमती दर्शवली. तहसीलदारांनी गावकऱ्यांना गावाचे नाव महसूल विभागाच्या यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. गावाची स्वच्छता, शाळेचा सुंदर परिसर, लोकसहभाग यांची प्रशंसा करत त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच या सभेच्या निमित्ताने शाळेमध्ये कोरोना लसीकरण शिबिरसुद्धा घेण्यात आले. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ३० नागरिकांनी लसीकरण केले. या वेळी सभेमध्ये तहसीलदार यांच्यासाेबत नायब तहसीलदार धनराज वाकुडकर, जांगदा ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका पोरेटी, ग्रामसभा अध्यक्ष कुंवर चव्हाण यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक आणि समस्त सिताटोला ग्रामवासीय उपस्थित होते.