शॉक देऊन रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आराेपींना अटक; चार किलाे मांस व हत्यार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 04:45 PM2022-11-30T16:45:09+5:302022-11-30T16:58:01+5:30

कुनघाडा परिसरातील आबापूर येथील घटना

Six arrested for hunting wild boar by electric shock; 4 kilos of meat and weapons seized | शॉक देऊन रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आराेपींना अटक; चार किलाे मांस व हत्यार जप्त

शॉक देऊन रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आराेपींना अटक; चार किलाे मांस व हत्यार जप्त

googlenewsNext

चामाेर्शी (गडचिरोली) : तालुक्यातील कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या आबापूर येथे विद्युत प्रवाहाने रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आराेपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे.

मधुकर सुधाकर लेकामी रा. आबापूर, भगवान वासुदेव नैताम, माेरेश्वर सखाराम ठाकूर दाेघेही रा. भाडभिडी, मधुकर गणू काेवासे रा. पुसेर, मधुकर भाऊजी पाेटावी रा. कराडगुडा, बाजीराव राजू पाेटावी रा. देवदा अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या सर्व आराेपींना न्यायालयाने १४ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

आबापूर जंगल परिसरात २३ नाेव्हेंबर राेजी सायंकाळच्या सुमारास जिवंत विद्युत प्रवाह लावून रानडुकराची शिकार करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने आबापूर गाव गाठून मधुकर लेकामी यांच्या घराची चाैकशी केली असता, घराच्या मागच्या बाजूला रानडुकराचे मांस वाळू घातले असल्याचे दिसून आले. अधिक माहिती घेतली असता, सदर मांस भाडभिडी येथील भगवान नैताम यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

अधिक चाैकशी केली असता, २२ नाेव्हेंबर राेजी सायंकाळच्या सुमारास माेरेश्वर ठाकूर यांच्या मदतीने बाबाजी नैताम यांच्या शेतात विद्युत प्रवाह साेडण्यात आला. यात दाेन जंगली डुकरे मृत्युमुखी पावल्याचे सांगितले. एका डुकराचे मांस मधुकर लेकामी यांना तर उर्वरित एका डुकराचे मांस मधुकर काेवासे, मधुकर पाेटावी, बाजीराव पाेटावी यांना विकल्याचे सांगितले. या अंतर्गत सहाही आराेपींविराेधात वन्यप्राण्यांची शिकार करून मासांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा नाेंद करण्यात आला. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी राहुल तांबरे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक सुरेश गव्हारे, एस. एम. मडावी, वनरक्षक प्रकाश काेराम, एन. बी. गाेटा यांनी केली.

मांस व हत्यार जप्त

मधुकर लेकामी यांच्या घराच्या मागे चार किलाे मांस वाळू घातले असल्याचे आढळून आले. सदर मांस जप्त करण्यात आले. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेले तार, मांस कापण्यासाठी वापरलेले विळे, सुरा, कुऱ्हाड आदी साहित्य वनविभागाच्या पथकाने जप्त केले आहे.

Web Title: Six arrested for hunting wild boar by electric shock; 4 kilos of meat and weapons seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.