नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले सहा कुकर बॉम्ब नष्ट
By संजय तिपाले | Published: May 6, 2024 02:53 PM2024-05-06T14:53:30+5:302024-05-06T14:54:41+5:30
टिपागड परिसरात कारवाई : निवडणुकीदरम्यान घातपाताचा होता डाव
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड (ता. धानोरा) येथील टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई ६ मे रोजी केली.
माओवादग्रस्त गडचिरोलीत यावेळी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे झाली. तब्बल १५ हजार जवान मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात होते. त्यामुळे नक्षल्यांचा घातपाताचा डाव हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले होते.
टिपागड परिसरात मोठ्या प्रमाणात पुरून ठेवललेली स्फोटके नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवली होती. दरम्यान, ६ मे रोजी गोपनीय माहिती आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलाविरोधी सी -६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला टिपागड परिसरात शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जवानांना स्फ़ोटकांनी भरेलेली ६ प्रेशर कुकर, ३ क्लेमोर पाईप व इतर साहित्य आढळून आले. बॉम्ब शोधक पथकाने ९ आयईडी व ३ क्लेमोर घटनास्थळीच नष्ट केले. सर्व टीम जावळच्या पोलिस ठाण्यात आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
गनपावडर अन् औषधे...
टिपागड हा घनदाट झाडी असलेला डोंगर परिसर आहे. तेथील जमिनीतील स्फोटके शोधण्याचे काम कठीण होते, पण पोलिसांनी ते शाेधून काढले. त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेटही सापडले. सुरक्षा जवानांचा घातपात करण्याच्या दृष्टीने नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडविण्याची तयारी केली होती, असे यातून समोर आले आहे.