पशुधन योजनांवर सहा कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 01:20 AM2016-05-23T01:20:21+5:302016-05-23T01:20:21+5:30
जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मार्फत वार्षिक योजनेत प्राप्त झालेल्या निधीतून बिगर आदिवासी, विशेष घटक, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील
एक वर्ष : जि.प. पशुसंवर्धन विभागाने केला १०० टक्के खर्च
गडचिरोली : जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मार्फत वार्षिक योजनेत प्राप्त झालेल्या निधीतून बिगर आदिवासी, विशेष घटक, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनांवर मिळून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ६ कोटी १ लाख २७ हजार रूपयांचा खर्च केला असून खर्चाची टक्केवारी १०० आहे.
बिगर आदिवासी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने इमारत बांधकामासाठी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला २०१५-१६ या आर्थिक वर्षात २ कोटी ५९ लाख रूपये प्राप्त झाले. विभागाने चार जुने व तीन नवीन अशा एकूण सात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी २ कोटी ५९ लाख रूपये खर्च केले. संकरीत कालवडी व सुधारीत जातीच्या पारड्यांची जोपासणा या लेखाशिर्षांतर्गत पशुसंवर्धन विभागाने ७५ लाभार्थ्यांना दोन लाख रूपयांचे पशुखाद्य वितरित केले. १३८ पशुवैद्यकीय दवाखाण्यात औषधी पुरवठा करण्यावर एक कोटी रूपयांचा खर्च केला.
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम या लेखाशिर्षांतर्गत १०० तलंगा गट वितरित करून प्राप्त झालेले सर्वच तीन लाख रूपये खर्च केले. एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिलांचे वाटप या लेखाशिर्षांतर्गत १०० गट वितरित करून आठ लाख रूपये खर्च केले. बिगर आदिवासी योजनेंतर्गत जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने एकूण ३ कोटी ७२ लाख रूपयांचा खर्च केला आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत ७८ शेतकरी गटांना एकूण १५६ दुधाळू जनावरे वितरित करून ५० लाख रूपये खर्च केले. दुबत्या जनावरांना खाद्य वाटप या लेखाशिर्षांतर्गत शेतकरी गटांना दुधाळू जनावरांसाठी खाद्य वितरित करून १० लाख रूपये खर्च केले. विशेष घटक योजनेंतर्गत एकूण ६० लाख रूपयांचा खर्च वर्षभरात करण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)