...अन् सहा मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:12 PM2019-12-28T18:12:55+5:302019-12-28T18:13:18+5:30
गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात रूढी आणि परंपरेचा पगडा इतर भागापेक्षा जास्त आहे.
- रोशन थोरात
भेंडाळा (गडचिरोली) : रूढी आणि परंपरेला फाटा देत आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा आणि मुखाग्नी देण्यापर्यंतचे विधी मुलींनीच पार पाडल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुक्रवारी (दि.२७) घडली. परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात रूढी आणि परंपरेचा पगडा इतर भागापेक्षा जास्त आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्याची सर्व जबाबदारी रूढीनुसार पुरूषच पार पाडतात. पण भेंडाळा येथे त्याला फाटा देत ६ मुलींनीच आईच्या अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पार पाडून परंपरेला फाटा दिला.
भेंडाळा येथील पार्वताबाई सावजी डांगे यांचे १०२ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांचे पती सावजी डांगे यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले. त्यांना मुलगा नसून ६ मुलीच आहेत. त्या सर्व वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. पार्वताबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पार्वताबाईच्या अंत्ययात्रेत आकटं पकडण्यापासून तर तिरडीला खांदा देण्यापर्यंत सर्व विधी ६ बहिणींनीच करण्याचा निर्णय घेतला.
पार्वताबाईच्या सर्वात ज्येष्ठ कन्या सुमन मुरकुटे (८६) रा.नागपूर यांनी अंत्ययात्रेत अग्रस्थानी राहून आकटं पकडले, तर सिंधू दहीकर (८१) रा.चंद्रपूर, कमल दहीकर (७५) रा.भेंडाळा, निमा समर्थ (७१) रा.भद्रावती, सुनंदा घुगडे (६८), रा.मूल, रेखा शेंडे (६४) रा.मोहाडी या कन्यांनी खांदा दिला. भेंडाळात पहिल्यांदाच अशा पद्धतीने महिलांनी खांदा दिल्याचे पाहून सर्वांनाच या गोष्टीचे आश्चर्य आणि कौतुकही वाटले.
अग्निसंस्कारही मुलींच्याच हस्ते
बहुतांश भागात महिला स्मशानातही जात नाही. पण पार्वताबाईंच्या निधनानंतर त्यांच्या कन्यांसह गावातील काही महिलाही अंत्यसंस्कारासाठी आल्या. या कन्यांनीच पार्वताबाईच्या चितेला मुखाग्नी दिला. भावपूर्ण वातावरणातील या अंत्यसंस्काराप्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले. पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देणाºया या घटनेचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.