सहा महिन्यांचे मानधन थकले, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:13 PM2024-10-22T15:13:56+5:302024-10-22T15:16:56+5:30

प्रशासनाकडून होतेय दिरंगाई : जिल्ह्यातील आठशेवर कुंटुंबे आर्थिक संकटात

Six months' salary not paid, Diwali of Gram panchayat employees is in darkness | सहा महिन्यांचे मानधन थकले, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

Six months' salary not paid, Diwali of Gram panchayat employees is in darkness

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचे सहा महिन्यांचे मानधन थकीत असून, मानधन अदा करण्याबाबत गतीने कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांचे आठशेवर कुंटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत.


कर वसुलीची अट रद्द करण्यात यावी. आकृतिबंधात सुधारणा करावी, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांचे थकीत असलेले मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गडचिरोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात कर्मचाऱ्यांनी दिले आहे. 


गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५८ ग्रामपंचायती असून, यामध्ये जवळपास ८१४ कर्मचारी नियमित मासिक मानधनावर काम करीत आहे. यामध्ये लिपीक, पाणीपुरवठा कर्मचारी, तसेच शिपाई आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ चे थकीत वेतन, तसेच ९ महिन्यांचे (सप्टेंबर २०२० ते मे २०२१) पर्यंतच्या फरकाची रक्कम (एरिअस) दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कराव्या, असे निवेदनात म्हटले आहे. 


ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, आम्हा कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते सप्टेंबर २०२४ चे थकीत वेतन, तसेच ९ महिन्यांचे (सप्टेंबर २०२० ते मे २०२१) पर्यंतचे फरकाची रक्कम (एरिअस) अजूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली असून , मानसिक संतुलन ढासळले यापूर्वी आपल्या स्तरावरून पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांचे वेतन अदा करण्यात आलेले होते. परंतु, पंचायत समिती स्तरावरून प्रत्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांच्या वैयक्तिक खात्यात रक्कम जमा न करता काही पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतच्या सामान्य निधी खात्यात रक्कम जमा केलेली आहे, त्यामुळे अद्यापही ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांना रक्कम मिळालेली नाही.


ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या जिल्हा परिषद स्तरावरून सूचना पंचायत समित्यांना देण्यात यावी. जेणेकरून दिवाळीपूर्वी रक्कम उपभोगण्यास मिळेल, अशी मागणी ग्रा. प. कर्मचाऱ्यांनी केली आहे. 


तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळेना 
ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लोकसंख्येच्या आधारावर मानधन दिले जाते. शासनाकडून मानधन मिळत असले तरी ते मानधन तुटपुंजे असून ते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. प्रशासकीय दिरंगाई याला कारणीभूत आहे.


"गेल्या सहा महिन्यांपासून आम्हा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित आहे. शासनाकडून निधी येत असला तरी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया दिरंगाईची आहे. आम्ही ग्रा.पं. स्तरावर कोरोना काळात काम केले. आत्ताही सक्रीय आहोत. मात्र मानधन वेळेवर मिळत नसल्याने मनोबल खचते. आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते."
- खुमेश हर्षे, अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, तालुका गडचिरोली


"पूर्वी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे मानधन कर्मचाऱ्यांच्या बचत खात्यात वळते केले जात होते. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात चुका असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने ग्रामसेवकाच्या खात्यात ही रक्कम वळती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सहा महिन्यांपासूनचे मानधन आमच्या खात्यात तातडीने देण्यात यावे. अशी आमची मागणी आहे." 
- गुरुदेव नैताम, सचिव, कर्मचारी युनियन, तालुका गडचिरोली.
 

Web Title: Six months' salary not paid, Diwali of Gram panchayat employees is in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.