सहा विद्यार्थी आढळले स्थलांतरित
By Admin | Published: January 3, 2016 02:01 AM2016-01-03T02:01:27+5:302016-01-03T02:01:27+5:30
राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहिली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे.
गडचिरोलीत शोधमोहीम : शिक्षण विभागाचा उपक्रम
गडचिरोली : राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहिली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या धोरणानुसार गडचिरोली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उध्दव डांगे यांच्या नेतृत्वात शनिवारी शहरात स्थलांतरित विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी इयत्ता पहिली, तिसरी व चौथीचे सहा स्थलांतरित विद्यार्थी आढळून आले.
सदर सहा स्थलांतरित विद्यार्थी मध्यप्रदेश व भोपाळ राज्यातील असून २८ डिसेंबर२०१५ रोजी रोजगारासाठी त्यांचे कुटुंबिय गडचिरोली शहरात स्थलांतरित झाले आहेत. सदर कुटुंब येथे उघड्यावर तंबू ठोकून वास्तव्याला आहेत. स्थलांतरित विद्यार्थ्यांमध्ये करणसिंह प्रकाश गुजर (७), निर्मल पिंटू पवार (११), करण इमलसिंग गुजर (८), राहुल निमयसिंग सोळंकी (८), रोशनी दिलीप पवार (८), शिवानी दिलीप पवार (६) यांचा समावेश आहे. सदर सहा स्थलांतरित विद्यार्थ्यांना गडचिरोली येथील नगर पालिकेच्या राजीव गांधी प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले असून हे विद्यार्थी ४ डिसेंबर सोमवारपासून शाळेत येणार आहेत. जेव्हा सदर विद्यार्थी स्वत:च्या गावाकडे स्थलांतरित होतील, तेव्हा त्यांना शिक्षण हमी कार्ड देऊन पाठविण्यात येणार आहे. जेणे करून त्यांना त्यांच्या गावी शिक्षण घेता येईल, असे गट शिक्षणाधिकारी उध्दव डांगे यांनी सांगितले आहे. विद्यार्थी शोधमोहिमेच्या पथकात निखिल कुमरे, संगीता खोब्रागडे, लता धात्रक, केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार, डी. एस. आकरे आदींचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)