कार्डाच्या नूतनीकरणाअभावी सहा हजार बांधकाम मजूर मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:07 AM2021-03-13T05:07:05+5:302021-03-13T05:07:05+5:30
गडचिराेली : काेराेना लाॅकडाऊनच्या काळात अनेक उद्याेगधंदे बंद राहिले. इमारत बांधकामावरही परिणाम झाला. नाेंदणीकृत मजुरांचा राेजगार हिरावला गेला. अशा ...
गडचिराेली : काेराेना लाॅकडाऊनच्या काळात अनेक उद्याेगधंदे बंद राहिले. इमारत बांधकामावरही परिणाम झाला. नाेंदणीकृत मजुरांचा राेजगार हिरावला गेला. अशा बांधकाम कामगारांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. गडचिराेली जिल्ह्यात ४४ हजार ५५ कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे मदत वाटप करण्यात आली. मात्र, नोंदणी कार्डाचे नूतनीकरण न झाल्याने जवळपास सहा हजार कामगारांना मदतीपासून वंचित राहावे लागले.
पूर्वी गडचिराेली येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे आवश्यक दस्तावेज जाेडून इमारत बांधकाम कामगारांना नाेंदणी करावी लागत हाेती. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही नाेंदणी ऑनलाइन झाली आहे. संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन कामगारांना नाेंदणी करता येते. प्रत्येक नाेंदणीकृत कामगारांना दरवर्षी कामगार कार्डाचे नूतनीकरण करावे लागते. मात्र, काेराेना लाॅकडाऊनच्या काळात हजाराे मजुरांनी आपल्या कार्डाचे नूतनीकरण केले नाही. परिणामी अशा सहा हजार कामगारांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागले.
बाॅक्स...
मुंबई कार्यालयाकडूनच थेट मदत
इमारत बांधकाम कामगार मुख्य कार्यालय मुंबईच्या वतीने नूतनीकरण झालेल्या अर्थात जीवित म्हणजे नाेंदीत सक्रिय असलेल्या जिल्ह्यातील ४४ हजार ५५ कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यात आली. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत जीवित अर्थात नाेंदीत सक्रिय असलेल्या कामगारांना दाेन टप्प्यांत मदत देण्यात आली. पहिल्या टप्प्यात दाेन हजार व दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये खात्यात वळते करण्यात आले. या मदतीमुळे काेराेनाने राेजगार हिरावलेल्या कामगारांना दिलासा मिळाला.
बाॅक्स...
असे आहे नाेंदणी व नूतनीकरणाचे शुल्क
बांधकाम कामगार मंडळाकडे कामगार म्हणून नाेंदणी करण्यासाठी १८ ते ६० वर्षे वयाेगटातील कामगार असावेत, वर्षभरात ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे गरजेचे आहे. नाेंदणीसाठी वयाचा पुरावा, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र आणि तीन पासपाेर्ट फाेटाे जाेडावे लागतात. २५ रुपये नाेंदणी शुल्क घेतले जाते. याशिवाय नूतनीकरणासाठीही शुल्क आकारले जाते.
काेट....
बांधकाम कामगार कार्यालय मुंबईमार्फत जिल्ह्यातील जीवित म्हणजे नाेंदीत सक्रिय असलेल्या कामगारांना थेट आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत वाटपाचे काम जिल्हा कामगार कार्यालयाकडे नव्हते. ते पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होत होते. जिल्ह्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कामगारांना मदत मिळाली. मात्र, नूतनीकरण न केल्याने काही कामगारांना मदत मिळाली नाही.
- रवींद्र उईके, जिल्हा कामगार अधिकारी, गडचिराेली
काेट....
बांधकाम कामगार म्हणून मी दाेन वर्षांपूर्वीच नाेंदणी केली आहे; पण नूतनीकरण केले नव्हते. काेराेना लाॅकडाऊनच्या काळात इमारतीचे बांधकाम ठप्प पडले. त्यामुळे सात ते आठ महिन्यांचा राेजगार बुडाला. मात्र, शासनाकडून मदत मिळू शकली नाही.
- प्रवीण हजारे, कामगार
काेट.....
कार्ड नूतनीकरणासंदर्भात पुरेशी माहिती मिळाली नाही. कार्यालयाकडे नाेंदणी असल्याने मदत मिळणार, अशी अपेक्षा हाेती. मात्र, शासनाकडून काेराेनाकाळात एकही रुपया मदत मिळाली नाही. चाैकशी केल्यानंतर नूतनीकरणाबाबत समजले.
- ईश्वर किरमे, कामगार