रुग्णवाहिका न मिळाल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 03:30 PM2024-09-30T15:30:08+5:302024-09-30T15:30:50+5:30

सिकलसेलने ग्रस्त : कोटगूल येथील घटना

Six-year-old boy dies due to non-availability of ambulance | रुग्णवाहिका न मिळाल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू

Six-year-old boy dies due to non-availability of ambulance

लोकमत न्यूज नेटवर्क 
कोरची :
तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावरील कोटगूल गावातील एका चिमुकल्या बालकाला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. वंश गुलाब टेंभुर्णे (६, रा. कोटगुल) असे मृत बालकाचे नाव आहे.


जन्मापासूनच वंशला डबल एस सिकलसेल आजार होता. रविवारी पहाटे रात्री अचानक त्याची प्रकृती बिघडली. मुलाच्या आई-वडिलांनी गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल नाकाडे यांनी प्रकृती तपासून त्याला रक्ताची गरज असल्याचे सांगून गडचिरोलीला रेफर करण्याचा सल्ला दिला. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. वडील गुलाब टेंभुर्णे यांनी खासगी वाहनाचा शोध घेतला. वाहन मिळण्यासाठी बराच उशीर झाला. खासगी वाहनाने धानोरा मार्गाने गडचिरोली दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच ग्यारापत्तीजवळ वंश याची प्रकृती खालावली. त्याला मुरूमगाव येथील रुग्णालयात नेले तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. 


हा प्रकार माहीत होताच रविवारी सकाळी कोटगूल येथील गावकरी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात गोळा झाले. डॉक्टरांवर रोष व्यक्त केला. जोपर्यंत आरोग्य केंद्रातील समस्या सुटत नाही तोपर्यंत आपण येथून हटणार नाही असा पवित्रा घेऊन तेथेच ठिय्या मांडला, घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश गोरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, नोडल अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी केंद्रात दाखल झाले. गावकऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची समस्या जाणून घेतली, तत्काळ डॉ. लोकेश चौधरी व डॉ. हर्षा उईके या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. दवाखान्यात होणाऱ्या विविध समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 


"प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका केवळ गरोदर माता व ० ते १ वर्ष वयाच्या बालकांसाठीच उपलब्ध करून देण्याचा शासनाचा नियम आहे. वंश हा सहा वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी रुग्णवाहिका देणे शक्य नव्हते."
- डॉ. काजल नाकाडे, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Six-year-old boy dies due to non-availability of ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.