कौशीकांचा झाला गेम
By admin | Published: March 22, 2017 01:53 AM2017-03-22T01:53:59+5:302017-03-22T01:53:59+5:30
जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अपक्ष सदस्य वर्षा दिलीप कौशीक यांचा या संपूर्ण राजकीय घडामोडीत
काँग्रेस, भाजप दोघांकडेही मागितले होते अध्यक्षपद
गडचिरोली : जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अपक्ष सदस्य वर्षा दिलीप कौशीक यांचा या संपूर्ण राजकीय घडामोडीत गेम झाल्याची चर्चा काँग्रेस व भाजप दोघांच्याही गोटात होती.
वर्षा कौशीक यांचे यजमान दिलीप कौशीक सुरूवातीपासून भाजपच्या संपर्कात होते व त्याचवेळी ते काँग्रेसच्याही संपर्कात होते. आपण अपक्ष असल्याने आपण कुठेही जाण्यास मोकळे आहोत, असे ते जाहीररित्याही बोलत होते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामांना शब्द दिल्यानंतर भाजपने सन्मानजनक वाटा देण्याचे त्यांना कबूल केले होते. मात्र सोमवारी कौशीक यांनी भाजपकडे अध्यक्ष पदाची मागणी रात्री उशीरा केली. त्याचबरोबर काँग्रेसकडेही अध्यक्ष पदाची मागणी केली. कौशीक यांना अध्यक्ष पद देण्यास काँग्रेस तयार झाली होती, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना मंगळवारी दिली. भाजपला कौशीक आपल्यासोबत राहणार नाही, याची चाहूल सोमवारी सायंकाळीच लागली होती. त्यांच्या बोलण्यानंतर भाजपचे जिल्ह्यातील आमदार, खासदार त्यांचा तोरा समजून गेले होते त्यामुळे भाजपने कौशीक यांना धडा शिकविण्यासाठी आविसंला सोबत घेत सत्तेचे समीकरण जुळवून आणले. त्यामुळे कौशीकांची गरजच उरली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जगन्नाथ बोरकुटे यांना उपाध्यक्ष पद देण्याचे निश्चित झाल्यानंतर कौशीकांचा अध्यक्ष पदांवरचा दावा झाला. भाजप, काँग्रेस दोन्हीकडे ते याच पदावर दावा ठेवून होते. आपल्या भरवशावरच दोन्ही पक्षाची सत्ता बसू शकते, असा त्यांचा तोरा होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रकार ओळखत आविसंला जवळ करण्याचा निर्णय घेतला.
सभागृहात जाताना भाजपच्या ३२ सदस्यांचीच यादी घेऊन डॉ. भारत खटी दारावर उभे होते. यात कौशीकांच्या नावाचा उल्लेख कुठेही नव्हता. अखेरीस आपल्याला कुठेच पर्याय राहिला नाही, हे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामांच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून वर्षा कौशीक जिल्हा परिषदेत दाखल झाल्या व भाजपच्या बाजुने मतदान केले. आता कौशीकांना भाजपकडून फार काही मिळण्याची आशा नसल्याचे भाजपच्या अनेक नेत्यांनी सत्ता समिकरण जुळल्यानंतर स्पष्टपणे बोलून दाखविले आहे. सोमवारच्या दिवसभरातील सत्ता स्थापनेचा सारा घटनाक्रमच आपल्यासाठी राजकारणातील मोठा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया आमदार क्रिष्णा गजबे यांनी दिली.