जंगलातील फायर लाईनसाठी जिवंत झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 05:00 AM2021-02-26T05:00:00+5:302021-02-26T05:00:27+5:30
उन्हाळ्यात जंगलाला आगी लागू नयेत यासाठी भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नेट (जाळी) लावण्याचा प्रयोग वनविभागाने केला हाेता, परंतु हा प्रयाेग फसल्याने वनविभागाने वणवे प्रतिबंधासाठी फायर लाइनचा कुचकामी प्रयोग चालविला आहे. यात रस्त्यालगतच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. जंगलांना आगी लागू नये म्हणून दरवर्षी वनविभागाकडून जंगल वाटेच्या दुतर्फा फायर लाइन जाळली जाते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : पूर्व विदर्भातील पानझडीच्या जंगलांना मार्च महिन्याच्या प्रारंभापासून वणवा लागण्याचे प्रकार घडतात. जंगलात वणवा लागू नये यासाठी दरवर्षी फायर लाइनची कामे केली जातात. परंतु ही कामे करताना जिवंत झाडे छाटली जातात. यामुळे वाढलेली झाडे नष्ट हाेतात. त्यामुळे वनविभागाची ही वणवे प्रतिबंध उपाययाेजना कितपत योग्य? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यात जंगलाला आगी लागू नयेत यासाठी भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नेट (जाळी) लावण्याचा प्रयोग वनविभागाने केला हाेता, परंतु हा प्रयाेग फसल्याने वनविभागाने वणवे प्रतिबंधासाठी फायर लाइनचा कुचकामी प्रयोग चालविला आहे. यात रस्त्यालगतच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. जंगलांना आगी लागू नये म्हणून दरवर्षी वनविभागाकडून जंगल वाटेच्या दुतर्फा फायर लाइन जाळली जाते. जंगल वाटेने जाणारे वाटसरू बिडी, सिगारेट ओढल्यानंतर पेटती बिडी, सिगारेट जंगलाच्या कडेला फेकून देतात. ही आग जंगलापर्यंत पसरत जाते. पण त्यापेक्षा जास्त आगी मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू झाला की लागतात. कारण त्या आगी मुद्दाम लावल्या जातात.
दरवर्षी फायर लाइन तयार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. पण वणवे लागणे थांबत नाही. वणवे विझवण्यासाठी वनविभागाकडे प्रभावी उपाययोजनादेखील नाही. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनांची आणि वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात हानी होते. मौल्यवान वनसंपदा नष्ट होते. अनेक वन्यजीव आगीत तडफडून मरतात. तर काही वन्यजीव जिवाच्या आकांताने सैरावैरा पळून मोकळ्या जागेचा आश्रय घेतात. त्यातही लोकांकडून त्यांची शिकार केली जाते.
वनविभाग विभागाकडून फायर लाइनसाठी रस्त्याच्या कडेच्या झाडांची जी तोड केली जाते ती अनावश्यक असल्याचा सूर व्यक्त होत आहे.
या कारणांमुळे जंगलात लागताे वणवा
मोहफूल वेचणारे लोक आपल्या साेयीसाठी झाडाखालील पालापाचोळा गोळा करून जाळतात. जाळलेला पालापाचोळा न विझवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन अख्खे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. याशिवाय दुसरे कारण म्हणजे खरिपाचा हंगाम आटोपला की, शेतकरी शेत साफ करतात. यासाठी ते धुरे जाळतात. यामुळे शेतातील आग लगतच्या जंगलात पसरत जाऊन ती पुढे रुद्ररूप धारण करते. तसेच तेंदुपत्ता ठेकेदार मजुरांकरवी जंगलांना आगी लावण्याचे अघोरी काम करतात. तेंदूच्या झाडांना अधिक फुटवे यावे म्हणून हे काम केले जाते. आग लागली तर ती विशिष्ट अंतरापर्यंतच पसरत जाऊन थांबावी यासाठी फायर लाइन तयार केल्या जातात. पण रस्त्याच्या कडेची झाडे अनावश्यक तोडली जातात.
जंगलात वणवा लागू नये म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फायर लाईन तयार केली जाते. विशेष म्हणजे, त्यात रस्त्याच्या कडेची केवळ खुरटी झाडे ताेडली जातात. फायर लाइनचा कचरा त्याच ठिकाणी गोळा करून जाळला जातो. त्यामुळे जंगलात कोणी बिडी, सिगारेट फेकून दिले तरी फायर लाइनमुळे जंगलात आग लागत नाही.
- मनोज चव्हाण,
सहायक वनसंरक्षक,
वनविभाग, वडसा