साग वृक्षांची कत्तल वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:21 PM2018-05-29T23:21:42+5:302018-05-29T23:21:51+5:30
पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात मौल्यवान साग वृक्षाची दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात मौल्यवान साग वृक्षाची दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा बिटात कक्ष क्र.३० व ३१ च्या शेकडो हेक्टर वनजमिनीवर २० ते २५ वर्षांपूर्वी साग लागण्यात आले होते. आज या साग वृक्षाची गोलाई ६० ते ८० से.मी. आहे. उंची ५० फुटापेक्षा अधिक आहे. सावलखेडा बिटातून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त होते. सावलखेडा बिटातील शेकडो हेक्टरवरील साग लक्ष वेधून घेते. या सागवानाने संपूर्ण आरमोरी तालुक्यात आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र सोन्याच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या सागवानाची वनतस्करांकडून अवैध तोड होत आहे. ३० व ३१ क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये शेकडो झाडे करवतीच्या सहाय्याने कापली जात आहेत. या जंगलात नेहमीच चौकीदार वनरक्षक फिरत असल्याचे सांगितले जाते. मात्र हे वनरक्षक व चौकीदार केवळ रस्त्यानेच फिरतात. जंगलात मात्र शिरत नाही. ही बाब वनतस्करांना माहित असल्याने जंगलाच्या अगदी मध्यभागी जाऊन वृक्षतोड केली जात आहे. एक झाड २० हजार रूपये किमतीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. शेकडो झाडे तोडण्यामुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे.
या सागवान झाडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनकर्मचाºयांवर आहे. मात्र सदर वनकर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सागवानाची तोड वाढली आहे.
एकीकडे शासन १३ कोटी वृक्ष लावण्याची तयारी करीत आहे. यावर शेकडो कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तर दुसरीकडे जीवंत असलेले व पूर्ण वाढ झालेली वृक्ष तोडली जात आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी आहे.
वनकर्मचारी खुटही करतात नष्ट
वनतस्कर थोड्या उंचीवरून झाडाची तोड करतात. खुट राहिल्यास त्याची चौकशी होऊन वनकर्मचाºयावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वनकर्मचारी राहिलेले खुटही पूर्णपणे तोडून नष्ट करून टाकतात. त्यामुळे खुट मापण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाºयाला याचा पत्ता लागत नाही. याचा सर्वाधिक तोटा म्हणजे तोडलेले झाड पुन्हा पालत नाही.